सात सरपंच, दोन माजी सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांचा ‘भगवा’ हाती
मुंबई: नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे आणि शेळगावचे काँग्रेसचे विधी उपाध्यक्ष ॲड अशोक गंगाराम कापसे यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांच्यासह काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शिकारे आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘भगवा’ हाती घेतला.या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात तळागाळात शिवसेना अधिक मजबूत होत असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली.
या वेळी मरखेल येथील प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक रेड्डी, व्यंकट पाटील, धनाजी पाटील, गंगाधर लोणे यांच्यासह सात विद्यमान सरपंच आनंद राजुरे, पवन भुताळे, विठ्ठल सुनसर, गजानन पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, अर्जुन गायकवाड, सुरेश मुंडकर, गौतम वाघमारे—तसेच माजी सरपंच बळीराम बेगडे आणि पांडुरंग वाघमारे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत राज्यातील महायुती सरकारने नांदेड जिल्ह्यात विविध विकासकामे राबवली. त्यामुळे शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली असून पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. “चांदा ते बांदा शिवसेनेचा विस्तार होत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होत असून नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला बालाजी पाटील खतगावकर, मुकेश जीवतोडे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.