बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे नेते सुनील तटकरे यांना स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसला, तरी भावनिक अधिकार नक्कीच आहे. अजित दादांनी काही गोष्टी मला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितल्या होत्या. राजकारणात सगळेच लोक जवळचे असतात असे नाही,” असे रोहित पवार म्हणाले.
शनिवारी (ता. ७) पिंपळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. अजित पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घटनांबाबत मनातील शंका त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या. “आमच्या मनात अनेक शंका आहेत. बजरंग सोनवणे यांनी जे काही सांगितले आहे, त्यामध्ये बॉम्बसारख्या गोष्टी असू शकतात. यावर मी १० तारखेला मुंबईत सविस्तर बोलणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, “मिटकरी हे दादांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न योग्य आहेत, तर काही मुद्द्यांबाबत ते भावनिक झाले आहेत. भावनिकतेच्या भरात अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. सीसीटीव्हीपासून सर्व बाबींवर मी प्रेझेंटेशनद्वारे भाष्य करणार आहे.”
मतदान केंद्रावर भावूक झाले रोहित पवार
मतदान केंद्रावर दादांच्या आठवणी सांगताना रोहित पवार भावूक झाले. “ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला, त्या दिवसापासून मी इथेच मतदान करतो. आज दादांबरोबरच्या चर्चा मनात घोळत होत्या. दादांची इच्छा होती की, त्यांच्या विचाराचे जास्तीत जास्त कार्यकर्ते निवडून यावेत. मतदार त्यांची इच्छा पूर्ण करतील,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “परिवार एकत्र राहावा ही दादांची मनापासूनची इच्छा होती. दादांकडून त्यासाठी प्रयत्न झाले होते. आम्हीही प्रयत्न करू. परिवार एकत्र आहे आणि तसाच राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्हायरल व्हिडिओ व विलीनीकरणावर भूमिका
शुक्रवारी (ता. ६) व्हायरल झालेल्या रोहित पवार, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या व्हिडिओबाबत बोलताना रोहित म्हणाले, “पवार साहेबांकडून आम्हाला भावनिक मार्गदर्शन मिळते. काल आमच्या तिघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली तर ते आम्हाला बोलावून मार्गदर्शन करतात.”
विलीनीकरणाबाबत ते म्हणाले, “१२ तारखेला पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर सांगणार आहे. दादांची नेमकी काय इच्छा होती, विलीनीकरण का होणार होते, त्यामागे राजकीय की भावनिक कारणे होती, हे सर्व स्पष्ट करेन.”
‘दादांची पोझिशन सुनेत्रा काकूंना मिळावी’
सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “सुनेत्रा काकूंमध्ये मला अजितदादा दिसतात. दादांची जी पोझिशन होती, तीच सुनेत्रा पवारांना मिळावी ही आमची इच्छा आहे.” कुटुंबातील स्थितीबाबत ते म्हणाले, “सुनेत्रा काकू, पार्थ, जय पवार आणि आम्ही अजूनही या दुःखातून सावरलो नाही. सध्या राजकीय विचार मनात येत नाहीत. ९ तारखेनंतरच कुटुंबात राजकीय चर्चा होईल.”
यावेळी राजेंद्र पवार, सुनंदा पवार आणि कुंती पवार उपस्थित होते. रोहित पवारांच्या या स्पष्ट विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.