दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामागे षडयंत्र! सुनेत्रा पवारांच्या शपथविधिने पक्ष स्थिर; सुजय विखे पाटील यांचा दावा

Share

मुंबई: भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्थिर करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीतील अस्थिरतेबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. “शपथविधीनंतर राजकारण स्थिर झालं. पक्ष स्थिर झाला. आमदार, कार्यकर्ते आणि जनतेला पुढचा नेता कोण हे स्पष्ट झालं,” असं ते म्हणाले.

सुनेत्राताईंच्या शपथविधीवर टीका करणाऱ्यांना सुनावताना विखे पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारापूर्वी राजीव गांधी यांची काँग्रेसच्या नेतेपदी निवड झाल्याचं उदाहरण दिलं. महाराष्ट्रासाठी ही काही पहिली घटना नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

“राजकारणात मनाला न पटणारे निर्णयही घ्यावे लागतात. स्पष्ट संकेत देण्यासाठी आणि पक्षात कोणतीही संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय आवश्यक होता. शपथविधी झाला नसता, तर षडयंत्र अधिक पुढे गेलं असतं,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

विलिनीकरणाबाबत भाजप-शिवसेनेशी चर्चा आवश्यक

राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. “अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घ्यायचा असेल, तर तो भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे भाजपच्या सहमतीनेच घ्यावा लागेल. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशीही चर्चा अपेक्षित आहे,” असं त्यांनी सांगितलं.

काही लोक या विषयावर घाई करत असल्याची टीका करताना त्यांनी, “एखादं प्रॉडक्ट बाजारात विकतोय आणि ते घ्यायलाच लागेल, अशा पद्धतीची ही घाई आहे. यात लाचारी दिसते,” असा टोला लगावला.

शंका-कुशंका म्हणजे गलिच्छ राजकारण

सुनेत्राताईंच्या शपथविधीवर, राष्ट्रीय अध्यक्षपदावर आणि विलिनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवर विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “शंका-कुशंका घेण्याचा धंदा अत्यंत वाईट आहे. ज्यांचा त्या पक्षाशी काहीही संबंध नाही, तेच शिकवायला निघाले आहेत. हे हास्यास्पद आहे,” असं ते म्हणाले.

विमान अपघाताच्या वादावर संतप्त प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या आरोपांवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, ब्लॅक बॉक्स अहवालातून सत्य समोर येईल. “कोणी बॉम्ब लावला, घात झाला अशा चर्चा मूर्खपणाच्या आहेत. एक व्यक्ती गेली आहे, किमान संवेदनशीलता ठेवा,” असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, “जर घात झाला असेल, तर चौकशीची मागणी करण्याचा पहिला अधिकार पवार परिवाराचा आहे. परिवार शांत असताना इतर लोक पेटून उठले आहेत, हे महाराष्ट्रात सुरू असलेलं गलिच्छ राजकारण आहे,” अशा शब्दांत सुजय विखे पाटील यांनी टीकाकारांना सुनावलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *