राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार?

Share

हर्षवर्धन सपकाळांनी उपस्थित केला सवाल

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत असून, पार्थ पवार यांच्या राज्यसभा प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे ते शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मुद्द्यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

‘शरद पवारांची राज्यसभेची इच्छा आहे का?’ – सपकाळांचा सवाल

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात, असे संकेत दिले होते. याच संदर्भात पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले,

“खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जे वक्तव्य केलं आहे, त्यावर निश्चितपणे आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. मात्र, मुळात प्रश्न हा आहे की शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? हा सवाल स्वतः संजय राऊत यांनीही उपस्थित केला होता. शरद पवार यांच्या वयोमानाचा, त्यांच्या जेष्ठत्वाचा आणि इंडिया आघाडीचे नेते म्हणून त्यांच्या भूमिकेचा विचार करून यावर चर्चा केली जाईल.”

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती.“शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे. बाकी सगळी हवाबाजी आहे. शरद पवार यांनी थांबावं अशी त्यांची मानसिकता असू शकते, मात्र आम्ही त्यांचे चाहते आहोत. आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्यासारख्या नेत्याचं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे,” असं राऊत म्हणाले होते.

तसेच,“शरद पवार ज्या दिवशी ठरवतील की त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची आहे, त्या दिवशी त्यांना निवडून आणण्याइतकी ताकद महाविकास आघाडीकडे आहे. आमच्याकडे तेवढी मते आहेत. शरद पवार यांना कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही,” असंही राऊत यांनी ठामपणे सांगितलं होतं.

राजकीय वर्तुळाचं लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीच्या हालचाली आणि पवार कुटुंबातील वाढलेल्या भेटीगाठी — या सगळ्यांमुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. शरद पवार स्वतः या विषयावर काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *