सिंधुदुर्ग : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी कालच आपल्या भाषणात राजकीय संन्यास घेण्याचे, राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. आणि आज (सोमवार) चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यकमावेळी त्यांना भोवळ आल्याने सर्वांची धावपळ उडाली. पण, प्रकृती ठिक असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे. तसेच, राजकीय निवृत्तीचे संकेत कोणी दिले? मी तसं बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूणमधील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात नारायण राणे यांना भोवळ आली होती, त्यांचा आवाजही बसल्याने त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तर, या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र, आता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. आता माझी तब्येत ठीक असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषणात बोलताना माझं ब्लड प्रेशर लो झालं होते आणि डायबेटिस शुगर सव्वातीनशेच्या वर गेली होती. त्यामुळे, मला अस्वस्थपणा आणि चक्कर आली होती. मात्र, आता मी ठीक आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, निवृत्तीचे संकेत कोणी दिले? असे म्हणत नारायण राणेंची यांनी राजकीय निवृत्तीच्या चर्चेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. माझं वाक्य नीट बघा.. जर मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय? निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही, असे नारायण राणेंनी स्पष्ट केले. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम देईल, असे मी म्हटल्याचे राणे यांनी सांगितलं. त्यामुळे, राजकीय निवृत्तीच्या चर्चांना राणेंकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गातल्या सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, “आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या घालून, काळ्या काचेच्या गाड्या घेऊन काही जण येतात… पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. बऱ्याच जणांनी माझ्या आड येण्याचं काम केलं, त्यावर मी आज बोलणार नाही. तेव्हाही मला अडचणी आल्या, आतांही आल्या. राजकारणात कट कारस्थान केलं जातंय. त्यामुळे, आता मी ठरवलंय, घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे… चांगल्याला जोपासा.”, असे राणेंनी म्हटले होते. मात्र, आता या वाक्याचा अर्थ समजावून सांगत त्यांनी निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.