पिंपळे गुरव येथे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा!

datta-maharaj-janmostav
Share

पुणे (पिंपळे गुरव) : श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्ट (मंदिर), पिंपळे गुरव, पुणे येथे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचा जन्मोत्सव २२ डिसेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सेवेकरी, शिष्यवर्ग व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज हे दत्त महाराजांचे दुसरे अवतार मानले जातात. त्यांची अनुभूती आज संपूर्ण महाराष्ट्रभर भक्तांना येत असून औदुंबर, गाणगापूर व नरसोबाची वाडी ही त्यांची प्रमुख तीर्थस्थळे मानली जातात. दत्त नामाची प्रचिती सर्व भक्तांमध्ये दिसून येते. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून श्री दत्त महाराजांचे अभिषेक, भजन, कीर्तन व विविध धार्मिक सेवा पार पडल्या. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण होते. श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्टचे विश्वस्त परमपूज्य गुरुवर्य मनोज दादा वेदपाठक यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांनी गुरुस्थानाचा महिमा आपल्या मधुर वाणीतून सांगितला. नामजपाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, दत्त महाराजांच्या नामस्मरणातून आपण त्यांना प्रसन्न करू शकतो आणि स्वतःच्या आयुष्याचे कल्याण साधू शकतो. जगात शांतता, समाधान व विश्वकल्याणासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी आपल्या प्रबोधनात स्पष्ट केले.

प्रत्येक घराघरात दत्त महाराजांचे नामस्मरण सुरू राहिल्यास भगवंताची कृपा निश्चितच प्राप्त होईल आणि समाजात शांतता, समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सायंकाळी सात वाजता श्री दत्त महाराजांची महाआरती पार पडली. त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा जन्मोत्सव सोहळा भक्तिभाव, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *