नागपूर: विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होणार असून, या हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मागणी भाजप आमदारांकडून करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. नागपूरमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयावरुन भाजप आमदार आक्रमक झाले आहेत.
भाजप आमदारांकडून आजच्या अधिवेशनात तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार त्यांनी नियमबाह्यरीत्या आपल्या हाती घेतल्याचा आरोप भाजपाने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना शासनाकडून कोणतीही नियुक्ती नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद स्वतःकडे घेतल्याचा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप आहे. अधिकृत अधिकारांशिवाय प्रकल्पाचा ताबा घेतल्याने मोठा अनियमिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे CEO म्हणून काम करताना काही निवडक कंत्राटदारांना अवैधरीत्या मोठ्या रकमांचे पेमेंट केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, तुकाराम मुंढे यांनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. दोन्ही प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाले होते, मात्र महाविकास आघाडी शासनकाळात ‘राजकीय दबावा’खाली कारवाई रोखली गेल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या 24 बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची ऑगस्ट 2025 मध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.