मुंबई : केंद्र सरकारच्या महत्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता आज (बुधवार) वितरीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मदत होणार आहे.
PM-KISAN योजना शेतकऱ्यांना निश्चित वार्षिक उत्पन्न सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत रु. २,००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट DBT माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जात आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “PM-KISAN योजनेचा 21 वा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या निधीमुळे रब्बी हंगामाच्या तयारीला मोठी मदत मिळेल. केंद्र सरकारकडून मिळणारे वेळेवरचे आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्यांच्या स्थिर उत्पन्न व आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे, आणि योजनेच्या अंमलबजावणीत विभागामार्फत पूर्ण पारदर्शकता व समन्वय राखला जात आहे. देशभरातील शेतकरी PM-KISAN च्या हप्त्याची प्रतिक्षा करत असताना, आज देण्यात आलेला 21 वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
महाराष्ट्रात या योजनेचा मोठा लाभार्थी वर्ग असून, एकूण 90,41,241 पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1 हजार 808 कोटी 25 लाखांची रक्कम जमा होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग तसेच बँकिंग यंत्रणेने समन्वय राखत हप्त्याचे वितरण वेळेवर पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे.