पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. बैठका, मुलाखती, चर्चा, जागावाटप या घडामोडी घडत असतानाच अचानकपणे आज (शनिवार) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडले. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलिस संरक्षण न घेता अचानक एकटेच बाहेर पडले. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
अखेर अजित पवार यांचे लोकेशन सापडले आहे. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार ज्या कारने बाहेर पडले होते, ती कार अजित पवार यांच्या शिवाजी नगर येथील जिजाई निवासस्थानाबाहेर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अजित पवार देखील इथेच जिजाई निवासस्थानात असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे अजित पवार पोलिस ताफा न घेता जिजाई निवासस्थानी का गेले? इथं ते कुणाला भेटायला आले? अजित पवार यांच्या आधीच जिजाई निवासस्थानी कुणी आले आहे का? अशा विविध चर्चांना उधाण आले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय जुळवाजुळव करताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट अजित पवार यांना सोबत घ्यायला तयार नसल्याने अजित पवार पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये वेगळी राजकीय आखणी करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून अजित पवार शरद पवार गटाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार गटात गुप्त बैठकांच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत केलं होतं. मात्र ऐनवेळी ही बोलणी फिसकटल्याची चर्चा आहे. घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचवरून दोन्ही गटात बिनसलं असल्याची चर्चा आहे. ही युती फिसकटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांसोबत बोलणी करून महाविकास आघाडीची मोट बांधल्याची माहिती आहे. राजकीय उलथापालथ घडल्यानंतर अजित पवार अचानक आपला ताफा आणि पोलिस संरक्षण न घेता पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याची माहिती आहे. आज सकाळी अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये आले होते. मात्र अवघ्या काही मिनिटांत ते पोलिस संरक्षण न घेता तिथून एकटेच निघून गेले. उपमुख्यमंत्री पदावरील एक राजकीय नेता पोलिस सरंक्षण न घेता अशा प्रकारे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार गटाशी युती फिसकटल्यानंतर आता अजित पवार पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये नक्की काय राजकीय समीकरण बसवतात? कुणाशी युती करतात की एकला चलोचा नारा देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.