लग्नाळू युवकाचं शरद पवारांना साकडं; मला पत्नी मिळवू द्या, उपकार विसरणार नाही…

sharad-pawar
Share

मुंबई: अकोला जिल्ह्यातील लग्नाळू युवकाने शरद पवार यांना पत्र लिहून, ‘मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही’, असे साकडे घातले आहे. शरद पवार यांनी अकोल्यात शेतकरी संवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी उपस्थितांपैकी काही नागरिकांनी त्यांना निवेदनं दिली. त्यामध्ये लग्नाळू युवकाचे निवेदन होते. यामध्ये त्याने स्वत:चा पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे. हे निवेदन वाचून शरद पवार यांच्यासह व्यासपीठावरील नेतेही अवाक झाले. संबंधित युवकाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात त्याला एकाकीपणा असह्य झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याने म्हटले आहे की, माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही.’

दरम्यान, ग्रामीण भागातील युवकांना किंवा शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे अनेक प्रकार सातत्याने कानावर पडत आहेत. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलींची संख्या वाढली आहे. शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील मुलापेक्षा शहरा भागातील नोकरदार युवकांना मुलींची जास्त पसंती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *