शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…

Share

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाला अनपेक्षित धक्का बसला आहे. सत्ताधारी गटाकडे सात सदस्य असतानाही केवळ एका मताच्या फरकाने विजय मिळवत विरोधी गटाचे गणेश वाळके उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

बाभुळसर खुर्द गावात तत्कालीन उपसरपंच शेखर डाळिंबकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सत्ताधारी गटाच्या सुमन शिंदे आणि विरोधी गटाचे गणेश वाळके यांच्यात लढत झाली. एकुण नऊ सदस्यांपैकी वाळके यांना ५ मते, तर शिंदे यांना ४ मते मिळाली. त्यामुळे गणेश वाळके हे एका मताने विजयी झाले. निकाल लागल्यावर विरोधी गटात जल्लोष, तर सत्ताधारी गटात बेचैनीचे वातावरण पसरले.

बाभुळसर खुर्द गावात गेल्या १५ वर्षांपासून दशरथ फंड तसेच शेखर डाळिंबकर यांचा ग्रामपंचायत मध्ये दबदबा कायम आहे. सन २०१०, सन २०१५ या दोन पंचवार्षिक मध्ये दशरथ फंड हे गावचे सरपंच होते. तर सन २०२० पासुन त्यांच्या सौभाग्यवती सोनाली फंड सरपंचपदी आहेत. तर सन २०१५ आणि सन २०२० या दोन पंचवार्षिक मध्ये शेखर डाळिंबकर उपसरपंच होते. मात्र, यावेळी उपसरपंचपदी विरोधी गटाचा उमेदवार जिंकल्याने ग्रामपंचायतीतील सत्ता-समीकरणांवर मोठा परिणाम झाला आहे.

गावात अनेक वर्षांपासून दशरथ फंड आणि शेखर डाळिंबकर यांच्याकडे सत्ता आहे. मात्र, उपसरपंचपदी विरोधी गटाचा उमेदवार विजयी झाल्याने गावातच नव्हे तर संपूर्ण शिरुर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाकडे सात सदस्य असूनही विरोधी गटाचा उमेदवार जिंकल्याने हा निकाल राजकीय दृष्ट्या धक्कादायक असुन गणेश वाळके यांनी केलेला हा राजकीय पलटवार मानला जात आहे.

या विजयामागे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि शिरुर तालुक्यातील सगळ्यांची राजकारणात कायमच ‘धांदल’ उडविणारे पै मंगलदास बांदल यांच्या रणनीतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय खेळींची पुनरावृत्ती बाभूळसरमध्ये झाल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. कारण उपसरपंचपदी विराजमान झालेले गणेश वाळके हे मंगलदास बांदल यांचे कट्टर समर्थक आहेत.

यावेळी निवडणूक अधिकारी सचिन चव्हाण यांच्या देखरेखीखाली संपुर्ण निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, गणेश वाळके यांच्या या अनपेक्षित विजयामुळे गावच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, सत्ताधारी गटात अंतर्गत नाराजीनं डोकं वर काढल्याची कुजबुज सुरु आहे. तर राजकारणातला हा “एक मताचा फरक” शिरुर तालुक्यातील आगामी निवडणुकांसाठी एक मोठा संकेत मानला जात आहे. तसेच गणेश वाळके यांच्या या विजयाने बाभूळसर खुर्द ग्रामपंचायतीत एका नव्या राजकीय समीकरणांची बीजं रोवली गेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *