अहिल्यानगर : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या टीका झाल्या. या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचं दिसून येत आहे. परिणामी त्यांनी त्यांच्या एका किर्तनामध्ये याबाबतची खंत व्यक्त करत थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
“आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत, आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला…मला तुम्ही घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय. काय… मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?”.
पुढे इंदुरीकर महाराज म्हणाले की, “त्याच्यामुळे आता मी कंटाळलो महाराज. जवळजवळ मी दोन-तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. थांबून घेणार आहे आता.. बास झाली ३१ वर्ष.. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ… माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना.. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही.. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजेत. खरंय की खोटंय? तुम्ही काहीच बोलत नाही.. हे त्याने बंद केलं पाहिजे.. त्याला लाज वाटली पाहिजे, की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता.”
दरम्यान, इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आले होते. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, या साखरपुड्यात सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ न स्वीकारता संपूर्ण कार्यक्रम साधेपणाचं उदाहरण ठरला.