मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विखे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले असून, त्यांनी एक वादग्रस्त घोषणा केली आहे. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचं माझ्याकडून बक्षीस दिले जाईल’ असे थेट आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे.
शेतकरी कर्ज घेतात, कर्जबाजारी होतात आणि कर्जमाफी मागतात, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले होते. ज्यामुळे शेतकरी आणि विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर बच्चू कडू यांनी अरे मेहरबानी माना लोक तुम्हाला मारत नाहीत, आम्ही हे सहन करणार नाही’ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.
नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाची करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे. फडवणीस साहेब एकीकडे कर्जमाफीची घोषणा करते हे वाचाळवीर मंत्री असे वक्तव्य करते, एवढं करुन सुद्धा लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा, असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.