कौशल्य विकास विभागात ४०० कोटींचा भ्रष्टाचार; काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी

Share

नागपूर: कौशल्य विकास विभागाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘पुष्पांजली फाउंडेशन’सह इतर संस्थांच्या माध्यमातून सुमारे ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली बनावट बिले सादर करून, सरकारी निधी उचलण्यात आला असेल, तर हा बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी केलेला गंभीर खेळ आहे, असेही ते म्हणाले.

कौशल्य विकास अभियानांतर्गत १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना प्रशिक्षण देऊन, त्यापैकी ७५ टक्के उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि रोजगार न देता बनावट बिलांच्या आधारे शासकीय निधी लाटण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. अमरावतीच्या उपायुक्तांनी अचानक तपासणी केली असता, संबंधित ठिकाणी कोणतेही प्रशिक्षण सुरू नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला असून, अन्य सहा ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

या प्रकरणासंदर्भात आवश्यक पुरावे उपलब्ध असून, कौशल्य विकास विभागातील संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी केल्यास किमान एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. योजनेमागील सरकारचा उद्देश चांगला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर भ्रष्टाचार होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक या चार प्रवर्गांतील कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवर्गातील १०० कार्यकर्ते, अशा एकूण ४०० कार्यकर्त्यांच्या सहभागातून उपेक्षित समाजाला एकत्र आणणे, विविध प्रश्नांवर विचारमंथन करणे आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीची दिशा निश्चित करणे, हा या शिबिराचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि विविध समाजघटकांच्या समस्या अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र, सरकारची भूमिका या चारही समाजांच्या विरोधात राहिल्याचे चित्र दिसते. या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरेल, असे ते म्हणाले.

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी संघर्ष केला. मात्र, अलीकडच्या काळात समाजात फूट पाडण्याचं प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उपेक्षित समाजघटकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न मांडणे आणि सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!