सरकारमधील विद्यमान २०० अधिकारी काँग्रेसला अंतर्गत माहिती देतात – राहुल गांधी यांचा दावा

Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारमधील अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय), परराष्ट्र मंत्रालय आणि अन्य खात्यांतील २०० अधिकारी काँग्रेसच्या संपर्कात असून, ते सरकारमधील अंतर्गत माहिती आम्हाला देत असतात, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथे केला आहे.

इंडी अलायन्सतर्फे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर आरोप करताना गांधी म्हणाले, की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पाठीशी घालत आहेत.

निवडणूक आयुक्तांवर टीका करताना गांधी म्हणाले, की ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत, एवढाच आमचा प्रश्न आहे. जोपर्यंत संविधानाचे रक्षण होत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.

ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि माफीचा साक्षीदार व्हावे, असा सल्ला देऊन गांधी म्हणाले, की तुम्ही चूक केली आहे. आम्हाला माहित आहे की तुम्ही केलेल्या चुकीमागे तुमचा हात नाही. आम्ही तुम्हाला माफ करण्याचा विचारही करू शकतो. तुम्ही दबावाखाली आहात हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे, राजीनामा द्या आणि माफीचा साक्षीदार व्हा.

विरोधी पक्षांच्या मोर्चापूर्वी तैनात केलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेवर ते म्हणाले, की एनडीए सरकारने केवळ ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी दिल्लीला वेढा घातला आहे. रस्त्यांवर ३० हजार सुरक्षा कर्मचारी का आहेत? भारताची राजधानी तुरुंगात का आहे? असा प्रश्न गांधी यांनी विचारला आणि पुढे म्हणाले, की राष्ट्रीय राजधानीत आरएसएस आणि भाजपच्या गुंडांना मोकळेपणाने फिरण्याची आणि तरुणांना मारहाण करण्याची परवानगी दिली जात आहे.

मात्र, आमची रणनीती वेगळी आहे. रस्त्यावर २० हजार ते ३० हजार पोलीस असावेत अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांचे संरक्षण करत आहेत, हे आम्हाला देशाला दाखवून द्यायचे आहे, असे ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांचे संरक्षण करून सरकार मोठी चूक करत असल्याचाही त्यांनी दावा केला.

जनता विरुद्ध मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध हा लढा आहे. सर्व विरोधी पक्ष एका बाजूला आहेत आणि ज्यांनी भारताचे अपहरण केले ते नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल आणि ज्ञानेश कुमार दुसऱ्या बाजूला आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!