आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ तेजस ठाकरे राजकारणात? आंदोलनातील उपस्थितीमुळे चर्चांना उधाण

Share

मुंबई: राजकीय घराणे असूनही आतापर्यंत राजकारणापासून अलिप्त असलेले उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे, यांचा आता राजकारणामध्ये प्रवेश होणार का? या चर्चेला आता उधाण येऊ लागले आहे. गेल्या रविवारी झालेल्या आंदोलनात तेजस ठाकरे यांची उपस्थिती होती.

मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात ११ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. या घडामोडींमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकीय भूमिकेत दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू असलेले तेजस ठाकरे हे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामासाठी ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत सक्रिय भूमिका घेतली. मात्र, तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीची राहिली आहे.

ठाकरे कुटुंबात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख राजकीय चेहरे आहेत. आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत, तर अमित ठाकरे यांनीही मनसेच्या माध्यमातून राजकीय भूमिका घेतली आहे.

तेजस ठाकरेंच्या या उपस्थितीमुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी टीका करताना म्हटले, की नवीन प्रजातीचे किडे तिथे आले असतील म्हणून तेजस ठाकरे आले असतील. नितेश राणेंच्या भाषेत सगळे ठाकरे आता वाकरे झाले आहेत.

आपल्या शोधातून बाहेर येत आणखी एक ठाकरे रस्त्यावर आले असे समजायचे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लावला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे, की हे आंदोलन काही राजकीय राहिले नाही, सर्वसामान्य नागरिकांचे हे आंदोलन आहे.

तेजस ठाकरे म्हणजे वन्यजीव संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारे असा त्यांचा आतापर्यंतचा परिचय. मात्र, रविवारी झालेल्या आंदोलनात शिवसेना भवन परिसरात आदित्य आणि अमित ठाकरे भूमिका मांडत असताना, भावांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांची गाडी अडवून धरणारे तेजस ठाकरे हे पाहायला मिळाले. याआधीही अनेक वेळा तेजस ठाकरे यांच्या राजकीय कार्यक्रमांच्या उपस्थितीने तेजस ठाकरे राजकारणात येणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच रविवारी पोलिसांच्या गाडीसमोर हात खुले करून उभे राहिल्याने पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!