राजस्थानच्या वाळवंटातील खनिज तेलाच्या उत्पादनासाठी वेदांताची २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

Share

नवी दिल्लीः उद्योगपती अनिल अग्रवाल यांची वेदांता ऑइल अँड गॅस कंपनीच्या माध्यमातून, राजस्थानातील नैसर्गिक खनिज तेलाच्या साठ्यांमधील घट रोखण्यासाठी आणि कार्यक्षम असलेल्या विहिरींमधून तेलाचे उत्पादन वाढविण्याची योजना आखली आहे. सध्याच्या प्रस्थापित तेलक्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याची योजना आखली आहे. ही कंपनी ईशान्य प्रदेशाला गॅस उत्पादनाचे नवीन केंद्र म्हणूनही विकसित करत आहे. पूर्वी केर्न इंडिया म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी, २०२६-२७ मध्ये उत्तर राजस्थानमधील मंगला, भाग्यम आणि ऐश्वर्या तेलक्षेत्रांमध्ये सुमारे २ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

केवळ बारमेरमधील या विहिरींमधून भारताच्या एकूण देशांतर्गत खनिज तेल उत्पादनापैकी अंदाजे २० ते २५ टकके उत्पादन होते. कंपनीने राजस्थानमधील तेल उत्खननासाठी एक विशिष्ट योजना विकसित केली आहे.

वेदांता ऑइल अँड गॅस राजस्थानमधील तेल उत्खननासाठी विद्यमान विहिरींवर लक्ष केंद्रित करत असून, मोठ्या निधीच्या माध्यमातून कंपनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यमान तेल विहिरींमधून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणार आहे.

वेदांता ऑइल अँड गॅसची ऊर्जा क्षेत्रातील ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. ही सुमारे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वेदांता समूहाच्या व्यापक भांडवली खर्चाचा एक भाग आहे, ज्याद्वारे समूह आपल्या तेल, वायू आणि धातू व्यवसायांचा आक्रमकपणे विस्तार करत आहे. देशांतर्गत तेल उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वेदांताने केलेला हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

राजस्थानच्या बारमेर येथील मोठ्या तेल विहिरी, जिथे ही गुंतवणूक नियोजित आहे, त्यांचा शोध केर्न इंडियाने लावला होता. विशेष म्हणजे, हा भारतातील सर्वांत मोठ्या कच्च्या तेलाच्या शोधांपैकी एक होता. २०११ मध्ये, वेदांता ग्रुपने केर्न इंडियाचे अधिग्रहण केले आणि नंतर २०१७ मध्ये, त्याचे वेदांता लिमिटेडमध्ये पूर्णपणे विलीनीकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!