पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (ता. १४) निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळसह पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा मावळच्या राजकारणावर उमटला होता. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाफना यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आमचे सहकारी आज आमच्यात नाहीत – ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आमचे सहकारी मदन शेठ नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. आज ते आपल्यात नाहीत. वीस वर्षांपूर्वी, महाविकास आघाडीच्या निर्णयांच्या निमित्ताने ते आमच्याशी जोडले गेले. ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते आणि त्याच काळात माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत आमची सोबत कायम होती.”
अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते मदन हरकचंद बाफना यांच्या निधनाने दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिलेले अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते मदन हरकचंद बाफना यांच्या निधनाने दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिलेले अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
कधीही भरून न निघणारी हानी – मंत्री छगन भुजबळ
आदरणीय वसंतदादा पाटील आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या विचारांची, कार्याची आणि जनसेवेची परंपरा सदैव स्मरणात राहील.
आमचे नाते आपलेपणाचे – जितेंद्र आव्हाड
वडगाव ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार आणि राज्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला. काही वर्षे ते ठाण्याचे पालक मंत्री देखील होते. माझे आणि त्यांचे नाते अत्यंत घनिष्ठ आपलेपणाचे होते. पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा नेता हरपला.
सर्वसामान्यांशी जिव्हाळा असणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड – रोहित पवार
ज्येष्ठ नेते, मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री मदनलाल बाफना यांचं निधन झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळा असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. मदन बाफना यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
स्पष्टवक्तेपणा आणि मनमोकळं दिलखुलास व्यक्तिमत्व – सुप्रिया सुळे
आदरणीय पवार साहेबांचे सहकारी मदन बाफना यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी मावळ तालुक्याचे प्रदिर्घ काळ नेतृत्व केले. उत्तम जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते, अशी त्यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा आणि मनमोकळे दिलखुलास वागणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे बाफना कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील – हर्षवर्धन सपकाळ
स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सार्वजनिक जीवनाला सुरुवात करून त्यांनी मावळचे दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले, तसेच महाराष्ट्र शासनात राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. मावळच्या विकासासाठी आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, अशी श्रद्धांजली हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली.
मदन बाफना यांचे पार्थिव मंगळवारी (ता. १५) वडगाव येथील बाफना महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या निवासस्थानावरून सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा निघाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.