नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपने शिंदेसेनेला डावलत स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर शिंदेसेना आणि दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या काळात दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप–प्रत्यारोप पाहायला मिळाले. मात्र निवडणूक पार पडताच शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली.
दोन दिवसांपूर्वी नाशिकचे अघोषित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सत्ताधारी नगरसेवकांची बैठक घेत महापौरपदासाठी भाजपच्या हिमगौरी आहेर आडके तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला.
महापौरपदासाठी संख्याबळ नसतानाही शिवसेना ठाकरे गटाकडून सीमा पवार यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत मिळत होते.
मात्र शुक्रवारी महापौर निवड प्रक्रियेदरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. ठाकरे गटाच्या सीमा पवार यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या हिमगौरी आहेर आडके यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, शिंदे गटाला हायकमांडकडून सत्तेत सहभागी होण्याचे आदेश मिळाल्याने उपमहापौरपदासाठी विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनी उमेदवारी मागे घेतली, तसेच भाजपचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांनीही अर्ज मागे घेतल्याने विलास शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला.या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही भाजप–शिंदेसेनेला पाठिंबा देत सत्ताधारी बाकांवर बसणे पसंत केले.
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याने भाजपचे आमदार देवयानी फरांदे पत्रकार परिषदेत भावूक झाल्या. भाजप कार्यालयाबाहेर झालेला राडा, बी-फॉर्मसाठी गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग, बंडखोरी आणि अंतर्गत संघर्ष यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.निवडणूक संपल्यानंतरही शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार बदलत राहिल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.