भारतात डेटा इतका स्वस्त की वायफायचीही गरज नाही; झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबूंचे इलॉन मस्कना रोखठोक प्रत्युत्तर

Share

चेन्नईः भारतात सॅटेलाइट इंटरनेट आणि स्टारलिंकच्या प्रवेशासंदर्भात ‘एक्स’वरील चर्चा वाढू लागली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ‘एक्स’वर मुकेश अंबानी आणि भारतीय दूरसंचार बाजारावर टीका केली होती, इतकेच नव्हे तर मुकेश अंबानींना ‘पंतप्रधान अंबानी’ असे संबोधून उद्योगपतींवर मक्तेदारीचा आरोपही केला होता. आता, मस्क यांच्या पोस्टवर, भारतीय टेक कंपनी झोहोचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेंबू यांनी इलॉन मस्क यांना थेट आरसा दाखवला आहे.

वेंबू यांनी आकडेवारी आणि जमिनीवरील वास्तवाचा हवाला देऊन, भारतीय दूरसंचार बाजाराचा बचाव केला आहे आणि इलॉन मस्क यांना त्यांच्या स्वतःच्या कंपन्यांमधील कमतरतांची जाणीव करून दिली आहे.

इलॉन मस्कने मुकेश अंबानी आणि भारतीय दूरसंचार बाजारावर टीका करत म्हटले की, अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत. स्टारलिंकने भारतातील स्पर्धेला परवानगी द्यावी अशी मागणीही केली आहे.

झोहोचे सीईओ आणि संस्थापक श्रीधर वेंबू यांनी इलॉन मस्क यांच्या पोस्टला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की भारतात जगातील सर्वांत स्वस्त इंटरनेट डेटा मिळतो. स्वतःचे उदाहरण देत त्यांनी लिहिले, की भारतात प्रवास करताना त्यांना वायफायची कधीच गरज पडली नाही. स्मार्टफोनच्या हॉटस्पॉटवरून ते लॅपटॉपवर काम करतात. वेंबू यांनी पुढे म्हटले आहे, की भारतीय लोक सहसा मोठ्या डेटा पॅकसह ड्युअल-सिम वापरतात आणि या स्वस्त डेटाचे श्रेय त्यांनी मुकेश अंबानी यांना दिले.

वेंबू यांनी मस्क यांना केवळ स्वस्त डेटाबद्दलच सांगितले नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतर सामर्थ्यांवरही प्रकाश टाकला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, भारतात जगातील सर्वांत स्वस्त औषधे मिळतात आणि परदेशी औषधे भारतात आयात केली जातात. त्यांनी यूपीआयचा उल्लेख करत सांगितले की, भारतात जगातील सर्वांत स्वस्त डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होत आहे.

त्यानंतर वेंबू यांनी मस्क यांना त्यांच्याच वास्तवाबद्दल जाब विचारला आणि स्पष्ट केले की, अमेरिकेच्या बाजारपेठेत टेस्लाला चिनच्या इलेक्ट्रिक मोटार कंपन्यांपासून संरक्षण मिळाले आहे, म्हणूनच अमेरिकेत महागड्या गाड्या विकल्या जातात.

ते म्हणाले की, मोदी सरकार मक्तेदारी सहन करत नाही आणि त्यांच्या धोरणांमुळे स्टार्टअप्स अशी रॉकेट्स बनवत आहेत, जी स्पेसएक्सच्या रॉकेट्ससाठी तसाच धोका निर्माण करत आहेत, जसा धोका चीनमध्ये उत्पादन झालेली वाहने टेस्लासाठी करतात. समारोप करताना म्हटले, “इलॉन, ही वस्तुस्थिती आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!