एसयू-५७, सुपर सुखोई आणि एस-५००; रशियाच्या संरक्षण प्रस्तावाच्या यादीत पाहा आणखी काय समाविष्ट

Share

नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे भारतात आगमन होताच, त्यांनी अनेक संरक्षण प्रस्ताव सादर केले, त्यात एसयू-५७ लढाऊ विमानांचे भारतात संयुक्त उत्पादन आणि ११ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्चाने एसयू-३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या ताफ्याला सुपर सुखोई श्रेणीमध्ये परिवर्तित करण्याचा समावेश आहे.

पुतीन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत व्यापार, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांव्यतिरिक्त संरक्षण विषयावरही चर्चा झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले, की लढाऊ विमानांच्या आधुनिकीकरणाबरोबरच, रशियाकडून एस-४०० हवाई-संरक्षण प्रणाली, पॅन्टसिर-एस १ एम पॉइंट- डिफेन्स प्रणाली, रडार आणि सामरिक पाणबुड्यांसंबंधीचे प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता आहे.

रशियाने त्यांच्या एस-५०० हवाई-संरक्षण प्रणालीचा विचार करण्याची सूचना केली आहे. एस-४०० ची क्षमता ४०० किमी आहे, तर ही प्रणाली ६०० किमीपर्यंतच्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना किंवा लढाऊ विमानांना लक्ष्य करू शकते. रशिया भारतात, शक्यतो एका भारतीय कंपनीच्या भागीदारीत, एस-४०० साठी देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी सुविधा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.

रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकच्या वृत्तानुसार अमेरिका, रशिया आणि चीन हे ​​तीन देश पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट तंत्रज्ञान असलेले आहेत. यामुळे एसयू-५७ भारतासाठी एक स्वाभाविक निवड ठरू शकते.

भारत आपल्या सुमारे २६० एसयू-३० एमकेआय लढाऊ विमानांच्या मोठ्या आधुनिकीकरणासाठी वाटाघाटी करत असून, याची सुरुवात ८४ विमानांच्या पहिल्या ताफ्याने होणार आहे. ११ अब्ज डॉलर्स खर्चाच्या सुपर सुखोई कार्यक्रमात, नवीन एई-एसए रडार, आधुनिक एव्हिओनिक्स, सुधारित इलेक्ट्रॉनिक-युद्ध क्षमता आणि नवीन इंजिनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!