भारतासोबतचे सर्व मतभेद समाधानकारकरित्या सोडवू – चीनची ग्वाही

Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, भारताच्या सहकार्याने परस्परांतील सर्व मतभेद सोडवण्यासाठी काम करू, असे चीनचे भारतातील राजदूत शू फेईहोंग यांनी ब्रिक्स परिषदेला प्रारंभ होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना येथे सांगितले.

परिषदेदरम्यान सी जिनपिंग यांची पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीची व्यवस्था केली जात असल्याच्या वृत्ताला, चिनी राजदूतांनी दुजोरा दिला आहे.

शी जिनपिंग हे सुमारे सात वर्षांनंतर ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी आणि शी यांच्यातील द्विपक्षीय बैठक आज सायंकाळी ५:४५ वाजता होणार आहे.

कझान आणि तियानजिन येथील बैठकांनंतर दोन्ही नेत्यांमधील ही सलग तिसरी बैठक असेल, असे भारतातील चीनच्या राजदूतांनी सांगितले. ते म्हणाले, की परस्पर सहकार्य आणि मतभेद मिटवणे यासह अनेक आघाड्यांवर चीन भारतासोबत काम करेल.

चीन भारतासोबत मिळून दोन्ही नेत्यांच्या धोरणात्मक दिशांची अंमलबजावणी करेल, द्विपक्षीय संबंध धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून हाताळेल, संवाद वाढवेल, सहकार्य दृढ करेल, मतभेद योग्यरित्या हाताळेल आणि एकमेकांच्या यशात योगदान देणारे चांगले शेजारी आणि भागीदार म्हणून मैत्री टिकवून ठेवेल, अशी ग्वाही शू यांनी त्यांच्या पोस्टमधून दिली आहे.

गलवान खोऱ्यात २०२० मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर शी जिनपिंग पहिल्यांदाच भारताचा दौरा करत आहेत. तेव्हापासून भारत-चीन संबंध सुधारले असून, चिनी राष्ट्राध्यक्षांनी कझान आणि तियानजिन येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!