मुंबई: राज्यातील सात राज्यसभा जागांसाठीच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून विधानसभा सदस्यांकडून निवडल्या जाणाऱ्या या सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात पडतील, असे सध्याचे गणित सांगते. मात्र उर्वरित एका जागेवरून महाविकास आघाडीत (मविआ) पेच निर्माण झाला आहे.
पवारांना उमेदवारी द्यावी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवावे, असा मतप्रवाह मविआतील एका गटात आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीतील राजकारणात होईल, असे समर्थकांचे मत आहे.
मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेमुळे काँग्रेस सावध झाली आहे. काँग्रेस हायकमांड सध्या ‘थांबा आणि वाट पाहा’ या भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेला खासदार भविष्यात एनडीएत गेला, तर पक्षाची नाचक्की होईल, अशी भीती काही नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
ठाकरे गटाचा ठाम दावा
दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी संख्याबळ आमचे अधिक असल्याचा दावा करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावही चर्चेत आहे. त्यांनी स्वतः राज्यसभेवर जाऊन राष्ट्रीय पातळीवर सक्रिय भूमिका घ्यावी, असा आग्रह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून धरण्यात आल्याचे वृत्त आहे. काँग्रेसमधील एका गटालाही ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मकता असल्याचे बोलले जाते.
काँग्रेसचा कल ठाकरेंकडे?
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसमधील काहींना पवारांपेक्षा उद्धव ठाकरे यांची उमेदवारी अधिक सोयीची वाटत आहे. ठाकरे राज्यसभेत गेल्यास दिल्लीत मविआची ताकद वाढेल आणि भविष्यातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील, असा तर्क लावला जात आहे.
‘बार्गेनिंग’ला वेग
एकाच जागेसाठी दोन दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आल्याने मविआमध्ये ‘बार्गेनिंग’ला वेग आला आहे. अखेर शरद पवार की उद्धव ठाकरे, की एखादा तिसराच तडजोडीचा चेहरा पुढे येणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.येत्या काही दिवसांत मविआच्या बैठका होऊन अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.