मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीभोवतीचे सस्पेन्स अधिकच गडद झाले असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
“पवार साहेबांवर जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम आहे. त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे ही सर्वांची इच्छा आहे. आम्ही मविआतील मित्रपक्षांना प्रेमाने विनंती केली आहे,” असे सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रकृती स्थिर; मुंबईत पुढील तपासणी
पुण्यातील रुग्णालयातून आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईत त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. पुढील २–३ दिवस आरोग्य तपासणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय काही दिवसांनीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मविआमध्ये हालचालींना वेग
पवारांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरू झाली आहे. सुळे यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी संवाद साधला आहे. तसेच गरज पडल्यास दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. पवारांना ‘संमतीचा उमेदवार’ म्हणून पुढे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत.
पवारांशी अद्याप सविस्तर चर्चा नाही
उमेदवारीच्या संदर्भात खुद्द शरद पवार यांच्याशी अद्याप सविस्तर चर्चा झालेली नसल्याचे सुळे यांनी सांगितले. मुंबईत आरोग्य सुधारल्यानंतर जयंत पाटील , जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे नेते पवारांशी थेट संवाद साधणार आहेत.
निवृत्ती की पुनरागमन?
शरद पवार यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. वयोमान, बदललेली राजकीय समीकरणे आणि पक्षातील पुढील नेतृत्व या पार्श्वभूमीवर ते तरुण चेहऱ्याला संधी देतील की स्वतः पुन्हा संसदेत जातील, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मात्र, सुळे यांच्या वक्तव्यानंतर पवारांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येऊ शकते, असे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत.आता पवार स्वतः काय निर्णय घेतात आणि मविआमध्ये यावर एकमत होते का, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.