अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्या समर्थनार्थ उठला आवाज अन् पुणे ZP चा मोठा निर्णय…

devyani-pardhi
Share

पुणे : अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावर पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. सत्य बोलण्याची किंमत देवयानी पारधी यांना चुकवावी लागली होती. देवयानी पारधी यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर अनेकांनी आवाज उठवला होता. यानंतर पुणे जिल्हा परिषदेने आपला आदेश मागे घेतला आहे.

देवयानी पारधी यांच्यावरील बडतर्फीची कारवाई अखेर पुणे जिल्हा परिषदेकडून मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली आहे. त्यांनी अंगणवाडीतील परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरील कारवाई आम्ही मागे घेत आहोत, असे वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

Devabhau

पोषण आहार शासनाच्या माध्यमातून येतो. जिल्हा परिषद केवळ वाटपाचे माध्यम आहे. याचा लेखाजोखा जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण अधिकारी ठेवत असतात. जर पोषण आहाराबाबत एखाद्या महिलेने आवाज उठवला तर लगेच तडकाफडकी कारवाई करण्याची अजिबात गरज नव्हती. जिल्हा बालकल्याण अधिकाऱ्यांना मी अशा सूचना केलेल्या आहेत की देवयानी पारधे यांना ताबडतोब कामावर घ्या. त्यांनी केलेल्या व्हिडीओवरून त्यांना निलंबित केले जाऊ शकत नाही, असे वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

बालकल्याण अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव बनवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. पोषण आहाराबाबत तक्रार केली म्हणून जर अशी कारवाई केली जात असेल तर ते स्वागतार्ह नाही, अशा शब्दात पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

अंगणवाडी पोषण आहारातील गैर व्यवहार व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमांवर टाकणाऱ्या अंगणवाडी सेविकेच्या बडतर्फीचे आदेश मागे घेत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेला पुन्हा कामावर रूजू करून घेणार असल्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *