बाबुरावजी घोलप विद्यालयात कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती…

baburao-gholap-school
Share

सांगवी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित ‘स्वच्छता हीच सेवा’ या विशेष पंधरवड्यांतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मधील बाबुरावजी घोलप विद्यालयात कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करणाऱ्या प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘टिम बेसिंक्स’ आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे सादरीकरण पार पडले.

या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच, ‘सिंगल युज प्लास्टिक’चा वापर पूर्णपणे थांबवून परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. कलाकारांच्या जिवंत आणि प्रभावी सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. “शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक संकलन मोठ्या प्रमाणावर केले जाते. या उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीमुळेच गेल्या वर्षी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून आपल्या विद्यालयाने प्लास्टिक संकलनात प्रथम क्रमांक पटकावला होता,” अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे यांनी केले, तर उपशिक्षक संजय मेमाणे यांनी आभार मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक कुमारी स्नेहल सोनवणे, आरोग्य निरीक्षक सचिन राठोड तसेच ‘टिम बेसिंक्स’चे सदस्य आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण होण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!