पुणे : पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरव, रामनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्ट संचलित श्री स्वामी समर्थ दत्त मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात, उत्साहात आणि मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
उत्सवाची सुरुवात सकाळी श्री दत्त महाराजांच्या पवित्र रुद्राभिषेकाने झाली. त्यानंतर भजन-कीर्तन सेवेचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारच्या सत्रात रिद्धी-सिद्धी महिला भजन मंडळाच्या प्रमुख उषाताई पडवळ यांनी आपल्या मधुर व भक्तिरसपूर्ण भजनांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर प्रख्यात आध्यात्मिक व्याख्याते श्री रोहित जवळकर यांनी “गुरु हीच ईश्वर सेवा” या विषयावर प्रभावी प्रबोधन करत गुरुतत्त्वाचे महत्त्व आणि सद्गुरूंच्या सेवेमुळे जीवनात घडणारे सकारात्मक परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मठाचे विश्वस्त परमपूज्य गुरुवर्य मनोज दादा वेदपाठक यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करत कलियुगात श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. नियमित नामस्मरणामुळे घरात शांतता, समाधान, सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते तसेच जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले.
संध्याकाळी श्री दत्त महाराजांची महाआरती अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. त्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. संपूर्ण परिसर “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता झाली.
श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्टच्या अन्नछत्र सेवेची १६ वर्षे पूर्ण!
पिंपळे गुरव येथे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा!