लखनऊः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी हातमिळवणी केल्यामुळे, देशातील सर्वांत निर्णायक मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या लढाईत तिसरी राजकीय शक्ती उभी करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे.
ओवैसी यांनी गुरुवारी लखनऊमध्ये नगीनाच्या खासदार आझाद समाज पार्टीसोबत (एएसपी) औपचारिकपणे युतीची घोषणा केली आणि आझाद यांना आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही घोषित केले. ओवैसी यांना सोबत घेऊन, आझाद यांनी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याला आघाडीच्या अजेंड्याचा मुख्य मुद्दा बनवला. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या ओवैसी यांच्या सोबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इयत्ता १२ वी पर्यंतचे मोफत शिक्षण, उत्तम रुग्णालये आणि तरुणांसाठी रोजगार ही आघाडीची प्राधान्य क्षेत्रे असल्याचे आश्वासन दिले.
एकीकडे समाजवादी पक्षाच्या नेतृत्त्वाखालील विरोधी पक्ष दशकभर सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारला सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे एआयएमआयएम-आझाद समाज पक्षाची युती मुस्लिम आणि दलित मतांचा एक हिस्सा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या निवडणूक गणितात संभाव्य अडथळा येऊ शकतो, जे मोठ्या प्रमाणावर याच दोन मतदार गटांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे, तर दलितांचे प्रमाण अंदाजे २१ टक्के आहे.
ओवैसी अनेक महिन्यांपासून विरोधी आघाडीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, इतकेच नव्हे तर त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला निर्णायक इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला नाही. सध्या जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये गुंतलेल्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने ओवैसींच्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले असून, एआयएमआयएम-आझाद समाज पक्ष युतीचे महत्त्वही कमी लेखले आहे.
ओवैसी आणि आझाद पक्षांच्या आघाडीला खरे तर काहीच महत्त्व नाही. उत्तर प्रदेशातील जनतेचा भाजप सरकारवरील विश्वास उडाला आहे. माझ्या मते, २०२७ मध्ये भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यास केवळ अखिलेश यादव हेच सक्षम नेते आहेत. हा लोकशाही देश आहे आणि कोणालाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे किंवा आघाडी करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद म्हणाले, की राजकीय पक्षांना युती करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्यांचा पक्ष स्वतःची दिशा ठरवेल. लोकशाहीत प्रत्येकाला युती करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यांना जे हवे ते ते करू शकतात; आम्ही आमचा मार्ग स्वतः ठरवू. राजकारणात, या टप्प्यावर या गोष्टींना फारसे महत्त्व नसते. प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो.
दरम्यान, भाजपने ओवैसी-आझाद आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याचे सांगत ती फेटाळून लावली आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या विश्लेषणातून असे दिसून येतेस की उत्तर प्रदेशात ५८ मतदारसंघ असे होते जिथे भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि निवडणुकीत पराभूत झाले.
यापैकी अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम, दलित आणि मागासलेल्या समाजांच्या मतांनी निर्णायक भूमिका बजावली. या यादीत सिराथूचा समावेश आहे, जिथे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पल्लवी पटेल यांनी ७,३३७ मतांच्या फरकाने पराभव केला होता. समाजवादी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांच्या इटावा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार केवळ १,६६२ मतांनी पराभूत झाले.
चांदपूर, रामनगर, इसाउली, दिबियापूर आणि डुमरियागंज यांसारख्या मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार २३४ ते ७७१ मतांच्या अगदी कमी फरकाने पराभूत झाले. हे ५८ मतदारसंघ निर्णायक लढाईचे मैदान बनू शकतात, जिथे ओवैसी-चंद्रशेखर यांच्या संभाव्य युतीचा थेट परिणाम होऊ शकतो.
जर तिसऱ्या आघाडीने उभे केलेले उमेदवार या मतदारसंघांमध्ये ५ हजार किंवा त्याहून अधिक मते मिळवण्यात यशस्वी झाले, तर ते निवडणुकीचा निकाल बदलू शकतात. जरी हे उमेदवार जिंकण्यात अयशस्वी झाले आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली, तरीही त्यांनी मिळवलेली मते जय-पराजयाचे अंतर निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. यामुळे प्रस्तावित तिसरी आघाडी २०२७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या गणितांमध्ये एक संभाव्य महत्त्वपूर्ण घटक ठरते.