शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने इंडोनेशियाच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा

Share

जकार्ता: अलीकडील न्यायालयीन निकालांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे, इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती गिब्रान राकाबुकिंग राका यांनी गुरुवारी (ता. १२) राजीनामा दिला आहे. माजी राष्ट्रपती जोको विडोडो यांचे ते पुत्र आहेत. रकाबुमिंग यांनी राजधानी जकार्ता येथील संसद भवनात, देशाची सर्वोच्च कायदेमंडळ संस्था असलेल्या ‘पीपल्स कन्सल्टेटिव्ह असेंब्ली’च्या नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला.

बैठकीतून निघताना राका यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रपतींना लक्ष्य करून केलेल्या फोन टॅपिंगमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी सामील असल्याच्या आरोपांच्या तपासाशी शैक्षणिक पात्रतेची चौकशी संबंधित नव्हती, असे दिसते.

इंडोनेशियाच्या संविधानानुसार, उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास नवीन निवडणूक घेतली जात नाही. जोपर्यंत जन सल्लागार सभा राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या दोन उमेदवारांमधून ६० दिवसांच्या आत नवीन व्यक्तीची निवड करत नाही, तोपर्यंत ते पद रिक्त राहते.

मंगळवारी राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान, दीर्घकाळ चालणारा राजकीय वाद टाळायचा असल्याचे सांगत राका यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु एका कॅबिनेट मंत्र्याने सांगितले, की राष्ट्रपतींनी त्यावेळी राका यांना स्वतःचा बचाव करण्याचा आग्रह केला होता. त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव स्वीकारला की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

घटनात्मक न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालानुसार, राका यांनी त्यांच्या परदेशातील शिक्षणासंदर्भात सादर केलेली कागदपत्रे निवडणुकीच्या निकषांची पूर्तता करत नाहीत. त्यानंतर, आठ राजकीय पक्षांतील १२० खासदारांनी बुधवारी सभागृहाच्या नेतृत्वाकडे सादर केलेल्या एका याचिकेमुळे, त्यांच्या महाभियोगास कारणीभूत ठरू शकणारी संसदीय प्रक्रिया सुरू झाली आहे.

इंडोनेशियाच्या कायद्यानुसार, निवडणुकीच्या अटींची पूर्तता न केल्याच्या आरोपांनंतरही उपराष्ट्रपती म्हणून काम करून राका यांनी घटनेचे उल्लंघन केले आहे का, याची तपासणी करण्यासाठी सभागृहाच्या नेत्यांनी एक विशेष समिती स्थापन करणे आवश्यक आहे. जर खासदारांना आरोपासाठी पुरेसा आधार असल्याचे आढळले, तर घटनात्मक उल्लंघन झाले आहे, की नाही यावर निर्णय देण्यासाठी सभागृहाने घटनात्मक न्यायालयाला विनंती करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!