कल्याण-डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदेसेनेशी केलेल्या युतीमागची भूमिका स्पष्ट केली आहे.
राजू पाटील म्हणाले की, ही युती सत्तेसाठी नसून मनसेचे नगरसेवक वाचवण्यासाठी करण्यात आली आहे. “मनसेच्या नगरसेवकांना सातत्याने भाजपकडून फोन येत आहेत. फोडाफोडीचं राजकारण खुलेआम सुरू आहे. आमचे नगरसेवक फुटू नयेत, पक्ष टिकून राहावा यासाठीच आम्हाला शिंदेसेनेला पाठिंबा द्यावा लागला,” असा आरोप त्यांनी केला.
‘फक्त पाठिंबा दिला, सत्तेत सहभागी झालेलो नाही’
शिंदेसेनेशी युती केल्याने मनसे सत्तेत सहभागी झाली असल्याच्या आरोपांना फेटाळून लावत राजू पाटील म्हणाले, “आम्ही शिंदेसेनेला फक्त पाठिंबा दिला आहे. सत्तेत गेलो नाही. सत्तेत जायचं असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो, तसं काहीही करण्यात आलेलं नाही. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.”या निर्णयाबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आधीच कल्पना देण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपवर घणाघात
राजू पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही जोरदार टीका केली. “राजकारणात संधी सगळ्यांनाच मिळते. पण मित्र असल्याचं सांगून जर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष फोडले जात असतील, तर ते ओळखण्याइतका मी बालबुद्धीचा नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “भाजपला मनसेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असंही ते म्हणाले.
राज ठाकरे यांची फोडाफोडीवर तीव्र टीका
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.“आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरला आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेला हा बाजार पाहून अक्षरशः शिसारी येते. हे चित्र पाहिल्यावर वाटतं, बाळासाहेब नाहीत ते बरं झालं,” अशा शब्दांत त्यांनी राजकीय परिस्थितीवर प्रखर टीका केली होती.