मुंबईः महापौर रितू तावडे आणि महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात अंतर्गत धुसफूस चालू आहे. वेळोवेळी ती उघडही होते. एका प्रकरणाबाबत बोलताना तावडे यांनी अप्रत्यक्षपणे शिरवाडकर यांचा उल्लेख झारीतील शुक्राचार्य, असा केला होता. त्यांचे हे वक्तव्य त्यांना भोवणार का, अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईच्या महापौरपदावर विराजमान झाल्यापासूनच वाद आणि आरोपांचे शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागले आहे.
रितू तावडे यांच्या वक्तव्याबाबत मुंबई भाजपच्या कोअर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत पक्षांतर्गत होत असलेल्या अंतर्गत वादावर चर्चा करण्याकरता ही महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी महापौरांच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. महापौर विविध कारणांमुळे वादात सापडत असल्याने अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असताना महापौरांनी ‘झारीतील शुक्राचार्य’ बोलत अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर टीका केली असल्याने यावरही महापौरांना जाब विचारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
गेल्या अनेक दिवसांपासून महापौर कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात आहेत, त्याची ही कारणे महापौरांना विचारण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोरच तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नगरसेवकांच्या एकत्रित बैठकीच्या आधी भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यासोबत बैठक घेतली. सभागृह नेत्यांना अंतर्गत वादाबाबत अमित साटम यांच्याकडून विचारणा करण्यात आली. तसेच सदस्यांच्या मतभेदावर आणि समन्वयाचा अभाव याची कारणेही विचारण्यात आली.
मुंबई महापालिकेत ज्यांचा वाद, त्यांनीच सोडवावा, अशी भूमिका मुंबई महापालिकेतील वादावर भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. महापौर, शिक्षण समिती सभापती, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांवर समन्वय राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंतर्गत वादात पक्षाला गृहीत धरू नका, असे स्पष्ट निर्देशही अमित साटम यांनी दिल्याचे समजते. नगरसेवकांच्या कामांवर फंड आणि इतर बाबी ठरतील. पालिकेच्या माध्यमातून जे चांगले निर्णय झाले ते मुंबईकरांपर्यंत पोचवा, असे अमित साटम यांनी सांगितले.
रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर या दोघींनाही अमित साटम यांनी योग्य ती समज दिल्याची माहिती आहे. महापालिकेत एकमेकांशी स्पर्धा न करता काम करण्याच्या सूचना साटम यांनी दिल्या आहेत.