रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू – मुख्यमंत्री

Share

श्रीरामपूरः रामगिरी महाराजांना काही लोक धमक्या देतात. त्यांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू, असा परखड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. अहिल्यानगर जिल्ह्यातील सरला बेटाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यात येईल. भविष्यात हे क्षेत्र आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनेल. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ते नावारुपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, की येथे सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा यांसह विविध कामांना यापूर्वीच सुरवात करण्यात आली आहे. योगीराज सद्गुरू गंगारिरीजी महाराज खंड हरिनाम धनगरवाडी (ता. राहाता) येथील सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा आणि पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते, मनातील मी पणा दूर होतो आणि जातिभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे दर्श घेण्याची भावना निर्माण होत असते. आजच्या जगामध्ये हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा मोठा उपाय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, की अखंड नामसप्ताही हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, समाजाला एकत्र आणणारा, शांती देणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आर्थिक सोहळा आहे. सात दिवसांच्या नामस्मरणातून आणि महंत रामगिरी महाराजांच्या मधुर वाणीतून परस्परांमध्ये प्रेम, बंधुभाव वाढविण्याचा तसेच व्यसनमुक्त आणि बलशाली समाज घडविण्याचा संदेश मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *