परिषद व्हिसावर भारतात येऊन ‘व्होट चोर गद्दी छोड’च्या घोषणा देणाऱ्या इटलीच्या नेत्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Share

नवी दिल्ली: परिषद व्हिसावर भारतात आलेल्या इटलीच्या एका नेत्याने हैदराबादमध्ये ‘व्होट चोर गद्दी छोड’ अशी राजकीय घोषणा दिल्याचे प्रकरण, आता सर्वोच्च न्यायालयात पोचले आहे. परदेशी नागरिकाला देशाच्या अंतर्गत राजकीय घडामोडींमध्ये भाग घेण्याची आणि राजकीय घोषणा देण्याची परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. परदेशी प्रतिनिधींच्या राजकीय हालचाली आणि परिषदेच्या व्हिसाच्या अटींबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या कायदेशीर परिणामांवर आता न्यायालय सुनावणी घेईल. हे प्रकरण तेलंगणा काँग्रेस सरकारने हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या इंडिया समिटशी संबंधित आहे.

याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे, की पार्टी ऑफ युरोपियन सोशलिस्ट्सचे महासचिव जियाकोमो फिलिबेक यांनी परिषदेदरम्यान ‘व्होट चोर गद्दी छोड’ अशा घोषणा दिल्या. इतकेच नव्हे तर, त्यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून परदेशी प्रतिनिधींना त्याचा अर्थ समजावून सांगितला.

याचिकाकर्ते झाहिद अली यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील रिझवान अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले, की फिलिबेक यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मोहिमेला पाठिंबा देऊन, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत भ्रष्ट झाला आहे. त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षालाही पाठिंबा व्यक्त केला होता.

याचिकेत म्हटले आहे, की भारतीय नेत्यांनी सरकारवर टीका करणे ही एक बाब असली तरी, इतर देशांतील राजकीय संघटनांशी संबंधित परदेशी प्रतिनिधींचा भारताच्या अंतर्गत राजकीय चर्चेत सहभाग ही एक गंभीर चिंतेची बाब आहे.

मंत्रालयाच्या नियमांनुसार, परिषद व्हिसावर भारतात येणारे परदेशी प्रतिनिधी त्यांच्या भेटीच्या घोषित उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे, फिलिबेकने राजकीय कार्यात सहभागी होऊन व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केले आहे का, हे न्यायालयाने तपासावे. या याचिकेत केंद्र सरकारला फिलिबेकविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात तेलंगणा सरकारच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. त्यांचा युक्तिवाद आहे, की राज्य सरकारने परिषदेचे आयोजन केले आणि परदेशी प्रतिनिधींना देशाच्या अंतर्गत राजकीय चर्चेत सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

याशिवाय, याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला अशीही मागणी करण्यात आली आहे, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना परिषदेशी संबंधित असे व्हीडिओ काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत, ज्यामध्ये इटालियन नेत्याने ही राजकीय टिप्पणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!