ओडिशाला उद्या धडकणार अकवान चक्रीवादळ; ५० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Share

अमरावती: पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील ‘अकवान’ हे तीव्र चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत असून, शुक्रवारी दुपारपर्यंत ते नरसपूर आणि पुरी दरम्यान, गोपाळपूरच्या पूर्वेला, उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता, हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळी वाऱ्याचा कमाल वेग ताशी ९० ते १०० किमी असेल आणि वाऱ्याचे झोत ताशी ११० किमीपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावर तयार झालेली चक्रीवादळ प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे जात होती. परंतु, तिच्या मार्गात बदल झाला आणि आता ती उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे, त्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये आणीबाणीची उपाययोजना करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी ८.३० वाजता, वादळाचे केंद्र नरसपूरच्या (आंध्र प्रदेश) पूर्व-आग्नेय दिशेला सुमारे ४२० किलोमीटर, कलिंगपट्टणमच्या (आंध्र प्रदेश) दक्षिण-आग्नेय दिशेला ४०० किलोमीटर, गोपाळपूरच्या (ओडिशा) दक्षिणेला ४९० किलोमीटर, पुरीच्या (ओडिशा) दक्षिणेला ५५० किमी आणि चेन्नईच्या (तामिळनाडू) पूर्व-ईशान्य दिशेला ५९० किलोमीटर अंतरावर होते. आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मते, जमिनीवर धडकण्यापूर्वी वादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव आता प्रामुख्याने उत्तर आंध्र प्रदेशवर अपेक्षित असून, मध्य आणि दक्षिण आंध्र प्रदेशवर त्याचा मोठा परिणाम होणार नाही. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होईल, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

आपल्या मार्गदर्शक सूचनेत, प्राधिकरणाने म्हटले आहे, की मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. सखल आणि किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्यास आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन तलाव, संवेदनशील मंडळे आणि किनारपट्टी भागांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

तत्पूर्वी, राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी संभाव्य परिणाम, खबरदारीचे उपाय आणि मदतकार्यावर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यांनी राज्यातील सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना पुढील ४८ तास पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश दिले आणि जीवित किंवा मालमत्तेची कोणतीही हानी टाळण्यासाठी सक्रिय उपाययोजना करण्याच्या गरजेवर भर दिला.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येऊ घातलेल्या चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी ओडिशाने आपली तयारी वाढवली आहे. राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमधील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी केंद्रे १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी बुधवारी म्हणाले, की राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार असून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य नियंत्रण कक्षात झालेल्या आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माझी म्हणाले, की या चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांवर आणि ते हाताळण्यासाठीच्या आमच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी आमच्या राज्य नियंत्रण कक्षात एक आढावा बैठक घेण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ २० तारखेला उत्तर आंध्र प्रदेशातील नरसपूर आणि पुरी दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!