जनतेने निवडून दिलेल्या सरकारमध्ये संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला ‘वॉर्निंग’ हा शब्दप्रयोग वापरणे निषेधार्ह

Share

कोविड काळात महाराष्ट्राची आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणार्‍या अजितदादांचे पंतप्रधानांनी संसदेत कौतुक केले

मुंबई: लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचे सरकार निवडून दिले. त्या महायुतीच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ‘वॉर्निंग’ देण्याचा शब्दप्रयोग अंजली दमानिया यांनी केला त्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर दिले आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारमध्ये संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला ज्यापध्दतीचा ‘वॉर्निंग’ हा शब्द वापरला गेला त्याचा आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना निषेध व्यक्त केला.

अंजलीताई दमानिया यांनी पुढील २४ तासात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचाच नव्हे तर पुणे जिल्हा पालकमंत्री पदाचाही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे मात्र राज्याच्या मंत्रिमंडळात कोण असावं आणि कोण नसावं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे याची कल्पना देतानाच अंजली दमानिया पूर्वग्रहदूषित आणि आकसाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आरोप करतात, असा थेट हल्लाबोलही आनंद परांजपे यांनी केला.

भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले तो दिवस आहे आणि हा देश संविधानावर आणि संविधानाने दिलेल्या लोकशाहीवर चालतो. ज्या लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचे सरकार निवडून दिले. त्या महायुतीच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अंजली दमानिया ‘वॉर्निंग’ देतात हे योग्य नाही असेही आनंद परांजपे म्हणाले.

अंजली दमानिया यांनी आज अनेक प्रकारची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली. एलआयओमध्ये भ्रष्टाचार आहे. जमीन घ्यायची नव्हती ती केवळ लीजवर घेऊन स्टॅम्प डय़ुटी माफ करायची होती असे अनेक आरोप केले. हे सगळे आरोपांचे पुरावे एसआयटीचे प्रमुख विकास खरगे यांना द्यावेत त्याचीही चौकशी होईल मात्र आपणच तक्रार करायची, आपणच तपास करायचा आणि आपणच एखाद्याला गुन्हेगार ठरवायचे हा त्यांचा जो पूर्वइतिहास आहे हा अत्यंत चुकीचा आहे अशी टीकाही आनंद परांजपे यांनी केली.

येत्या २४ तासात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजीनामा दिला नाही तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ घेऊन त्यांच्या कार्यालयात जाईन आणि जोवर भेट होत नाही तोवर त्यांच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सामान्यातील सामान्य माणसाला भेटत असतात. अंजली दमानिया यांची इच्छा अजितदादा पवार यांना भेटायची असेल तर आम्ही त्यांची भेट घडवून आणू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांना वेळ देतील की नाही हे माहीत नाही. पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांना नक्कीच वेळ देतील असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवशीच एसआयटी स्थापन केली होती. एफआयआरही दाखल झाले आहेत मात्र आकसापोटी, सुडबुद्धीने, बेछूट असे आरोप अंजली दमानिया यांनी अजितदादा पवार यांच्यावर करु नये असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा एक सिनेमा आला होता.त्यामध्ये डॉ. अस्थाना यांना ‘अँगर मॅनेजमेंट’ चा जसा आजार होता त्याप्रमाणे अंजली दमानिया यांच्यावर ट्रीटमेंटची गरज आहे का असे त्यांचे बेछूट आरोप बघून मला कधी कधी शंका येते असा जबरदस्त टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.

अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार केला आहे. अजितदादा पवार यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. अजितदादा पवार यांनी पहिल्या दिवसापासून आपली भूमिका तीन वेळा माध्यमांसमोर मांडली आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले. कोविड काळात महाराष्ट्राची आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली असे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले होते. मात्र अंजली दमानिया या फक्त अजितदादा पवार यांच्यावर सातत्याने आरोपांचा भोंगा घेऊन फिरत आहेत ही दुर्दैवी बाब आहे असेही आनंद परांजपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *