इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर…

indurikar-maharaj-daughter
Share

पुणे: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी लेकीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या टीकेला आता इंदुरीकर महाराजांनी उत्तर दिलं आहे. ‘एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठीच केला, की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे,’ असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले, ‘मला तक्रार आली की मी हे लग्न साध्या पद्धतीने करा असं सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटामाटात केला. वीस वर्षे लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करण्याचे ठरवले. करायचा तर सगळ्यांचाच नाहीतर एकाचही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला. की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. साखरपुड्यात जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं. चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही. त्याच्यासाठी आठ दिवस वाद केला पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं. जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस वारकऱ्यासारखा ठेवला. कारण सगळ्यांना समान वागणूक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुर्ची नाही. ज्याला आजार आहे त्यांनीच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. कोणाला कमी पाहिलं नाही. कोणाची स्तुती केली नाही. निंदा केली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. लोकांचा आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो.’

साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश देणारी इंदुरीकर महाराज यांनी स्वतःच्या लेकीच्या साखरपुडातच लाखो रुपये खर्च केल्याचा समोर आल्यानंतर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका केली. यावरून आता इंदुरीकर महाराजांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी नुकताच लेकीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पाडला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. मुलीची आणि जावयाची रथावरून मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी असा थाटामाटात साखरपुडा केल्यानंतर समाजातील विविध स्तरांमधून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Video: इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा थाटात साखरपुडा, काय करतो होणारा जावई, नेटीझन्सची टीका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *