राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये वादग्रस्त विधान, विरोधकांकडून टीकेची शक्यता
जळगाव: एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मतदानाच्या अधिकारावर भाष्य करताना केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यक्रमात उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुखांना उद्देशून बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले,“मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा.”या विधानावरून टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पाटील पुढे म्हणाले की, “राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. राजा आता मतपेटीतून जन्माला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा-बिर्लांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना समान मतदानाचा अधिकार दिला. हेमा मालिनी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाला एकच मत आहे.”
एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्ष हल्ला
याच भाषणात गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले,“भाजप-शिवसेनेची लढत असताना राष्ट्रवादीने भाजपचं काम केलं. हा कोणता पिक्चर होता?”पुढे ते म्हणाले, “खडसे आमच्यावर टीका करायचे. आम्हाला जेलमध्ये टाकलं, आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला. जिल्ह्यात सर्वांना त्रास दिल्यामुळे आज त्याची फळं भोगावी लागत आहेत. माजी मंत्र्यासोबत बॅग पकडायला कोणीही राहत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
इम्तियाज जलील आणि संजय राऊतांनाही टोला
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवागार करू’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले,“कोणी बोलल्याने महाराष्ट्र हिरवागार होत नाही. अशा वक्तव्यांना अर्थ नाही. यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये.”तर संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं,“राऊतांना कोण कोण आहे हेच माहिती नाही. त्यांच्या बोलण्यापुरत्याच गोष्टी आहेत. या निवडणुकीत आम्ही महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा परफॉर्मन्स केला आहे,” असा दावा त्यांनी केला.