चांगल्या शाळांची मागणी सरकारविरोधी कशी? ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांचा सवाल…

Share

नाशिक: चांगल्या शाळांची मागणी करणे किंवा शाळांची स्थिती सुधारण्याचा आग्रह धरणे हा सरकारविरोधी ‘नरेटिव्ह’ कसा काय ठरू शकतो, असा सवाल ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. तसेच परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आश्रमशाळां’ना भेट देऊन वस्तुस्थिती पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक येथील ईदगाह मैदानावर आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, अन्न आणि शिक्षण यातील तफावत पूर्णपणे अमान्य आणि असह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दर्जेदार अन्न आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतील १०० हून अधिक आदिवासी विद्यार्थी ईदगाह मैदानावर आंदोलन करत असून, तीन विद्यार्थी बेमुदत उपोषणावर बसले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था, आरोग्याचे प्रश्न आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यांकडे दीपके यांचे लक्ष वेधले.

पत्रकार परिषदेदरम्यान उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे समजताच दीपके यांनी पत्रकार परिषद अर्धवट थांबवून विद्यार्थ्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालय गाठले. नाशिकचे विवेक गावित, सुरगाण्याचे राहुल पावरा आणि नंदुरबारच्या लक्ष्मी जाधव हे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषणावर आहेत.

राज्यातील आश्रमशाळांमध्ये ५९२ विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांच्या कुटुंबांना भरपाई द्यावी व जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे, आश्रमशाळांमधील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूंविषयी जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सेंट्रल किचन व्यवस्थेऐवजी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना ताजे अन्न शिजवून दिले जावे, देणगीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून होणारी कथित वसुली थांबवावी, आदिवासी क्रीडा प्रबोधिनीतील भ्रष्टाचाराच्या तपासासाठी सामाजिक संस्थांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्याला १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!