दुःखातून धाडसाकडे! उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांची खऱ्या अर्थाने कसोटी सुरु

Share

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहित सुनेत्रा अजित पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, त्यांच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

पती व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत पक्षाची गरज, सरकारमधील स्थैर्य आणि संघटन सावरण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पुरुषप्रधान राजकारणात मोठं आव्हान

पुरुषी मक्तेदारी असलेल्या राजकीय क्षेत्रात सुनेत्रा पवार यांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागणार आहे. पतीचा राजकीय वारसा सांभाळताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, पक्षातील अंतर्गत राजकारण, तसेच दोन राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये योग्य भूमिका घेणे—ही त्यांच्या समोरील प्रमुख आव्हाने आहेत.

सामाजिक व शैक्षणिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी

सुनेत्रा पवार या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) या संस्थेची स्थापना केली असून, सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे. त्या ‘विद्या प्रतिष्ठान’ या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त देखील आहेत.

लोकसभा पराभवानंतर राज्यसभेपर्यंतचा प्रवास

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. हा निर्णय खुद्द अजित पवार यांच्या आग्रहाने झाल्याचं सांगितलं जातं. आता राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे.

पक्षातील भविष्यातील भूमिका चर्चेत

उपमुख्यमंत्रिपदासोबतच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार यांचा वारसदार चेहरा म्हणून पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहत आहेत.

राजकीय कसोटीला सुरुवात

दादांचा दरारा, संघटनावरची पकड आणि निर्णयक्षमता यांची तुलना होणं अपरिहार्य असलं तरी सुनेत्रा पवार यांना स्वतःची राजकीय छाप उमटवावी लागणार आहे. त्या आमदार म्हणून निवडून येतील का, महिलांसाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर किती प्रभावी काम करतील, तसेच पवार कुटुंब व पक्ष त्यांना कितपत साथ देईल—याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.राजकारणाच्या कठीण वाटेवर सुनेत्रा अजित पवार या कोणता मार्ग काढतात आणि कशी छाप उमटवतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *