एकनाथ शिंदेंनी ५०० कोटी रुपये देऊ केल्याच्या जरांगे यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Share

चंद्रपूर: बीडमधील नारायणगडावर झालेल्या दसऱ्या मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला. त्यांनी दावा केला की, एकनाथ शिंदेंनी आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चालू आहे. मात्र, याबाबत त्यांनीच खुलासा करावा. या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे पाटलांच्या या आरोपावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौन पाळले, तर भरत गोगावले यांनी जरांगे पाटलांना इशारा दिला आहे.

जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी पलटवार केला असून, दसरा मेळाव्यातील सभेतून जरांगे पाटलांची चौकशी करण्याची मागणी केली, तर मंत्री भरत गोगावले यांनी देखील जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरुन पलटवार करत टीका केली. जरांगे हे संधीसाधूपणा करत आहेत. जरांगेंना आमचे मराठा समाजाचे नेते उत्तर देत असून, एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी केलेले काम जनता विसरणार नाही. त्यामुळे जरांगे पाटील काही उलट सुलट करायला लागले तर त्यांना रायगडाच्या मावळ्याचा शाप लागेल. उलट-सुलट केल्यास त्यांना भोगावे लागेल.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जरांगे पाटलांच्या आरोपांवर विचारले असता, आमचा काय संबंध म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचा टाळले. ज्यांनी आरोप केलाय त्यांनी पाहावे आणि ज्यांच्यावर आरोप झालाय ते उत्तर देतील, यात आमचा काय संबंध आहे.

एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांच्या आरोपावर प्रतिक्रिया म्हणाले, की आमचे सर्व प्रवक्ते यावर बोलत आहेत. आपण कुणालाही ५०० कोटी रुपये दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटलांनी शहानिशा करुन बोलावे. जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल.

जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करत होते, तेव्हा आपण मराठा समाजाला विविध कामांतून न्याय देण्याचे काम केले. गेल्या ६० वर्षांत जे काम झाले नाही, ते आम्ही केले. आजही मराठा समाजाचे आरक्षण टिकले आहे. मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे करत होते, त्यामुळे आम्ही त्यांना मदत दिली. त्यांनी त्याचा राजकीय व्यासपीठ बनवू नये, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

One thought on “एकनाथ शिंदेंनी ५०० कोटी रुपये देऊ केल्याच्या जरांगे यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!