आरपीआय (खरात गट) महायुतीत सामील होणार?

Share

मुंबईः राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती. पडद्यामागे तशा घडामोडीही वाढल्या होत्या. राजकीय वर्तुळात या चर्चेला जास्तच हवा मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी समोर येत आम्ही विरोधातच असू, असं स्पष्टीकरण दिलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील समोर येत आता महायुतीत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असं सांगून टाकलं होतं. आता ही चर्चा मागे पडलेली असतानाच वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या आहेत. आता आरपीआय (खरात गट) पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरपीआय (खरात गट)चे सचिन खरात वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्या पक्षाचा राज्यात एकही खासदार किंवा आमदार नाही. आंबेडकरी विचारांचे नेते म्हणून खरात यांना ओळखले जाते. सचिन खरात सोबत आले तर महायुतीला भविष्यात आंबेडकरवादी, बहुजनांची मतं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना आता सचिन खरात हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीचा सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. याआधी खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा खरात गट महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महायुतीसाठी आंबेडकरवादी बहुजनांची मतं खूप गरजेची आहेत. हिंदुत्त्वाच्या नावाखाली महायुतीतील शिंदे गट आणि भाजप एकत्र आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरून नंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीही त्यांच्यात सामील झाली. परंतु आम्ही सर्वसमावेशक आहोत, आम्हाला समजातील तळागाळातील लोकांसाठी काम करायचे आहे, आमचे सरकार हे आंबेडकरवादी मतदारांच्या हिताचे आहे, हा संदेश देण्यासाठी महायुतीमध्ये एखादा आंबेडकरवादी चेहरा असणे गरजेचे आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेदेखील महायुतीमध्ये सामील आहेत. असे असताना खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला तर भविष्यात त्याचे काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *