प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप करत बड्या महिला नेत्याचा काँग्रेसला रामराम

Share

माजी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाला अलविदा केला आहे. काँग्रेसमध्ये मेहनती आणि पात्र नेत्यांचे ऐकले जात नाही, तर निर्णय खासगी स्वार्थातून घेतले जात असल्याचा आरोप करत त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

काँग्रेस सोडण्यामागे पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग जबाबदार असल्याचा थेट आरोप डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी केला आहे. “राजा वडिंग हे आतापर्यंतचे अक्षम आणि भ्रष्ट प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी काँग्रेसला उद्ध्वस्त केले,” असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.

राजा वडिंग यांनी मुख्यमंत्र्यांशी संगनमत करून स्वतःला वाचवले आणि आम आदमी पार्टीशी हातमिळवणी करत किरकोळ फायद्यासाठी काँग्रेस विकली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “माझ्यासाठी निलंबनाचं पत्र तयार होतं, पण नवजोत सिद्धूंना हरवण्यासाठी मजीठियासोबत काम करणाऱ्या सुमारे १२ ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, पण ते उघड करण्यात मला रस नाही. कारण काँग्रेसमध्ये आता आशादायक नेतृत्व उरलेले नाही,” असेही त्या म्हणाल्या. आशु, चरणजीत चन्नी, भट्टल, डॉ. गांधी यांच्याविरोधात कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राजा वडिंग यांना लक्ष्य केले.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात नवजोत कौर सिद्धू यांनी मुख्यमंत्रीपदासाठी ५०० कोटी रुपयांची ‘बोली’ लागते, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.

काँग्रेस सोडल्यानंतर आता नवजोत सिंग सिद्धूही पक्षाला रामराम ठोकणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, सिद्धूंनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवजोत कौर सिद्धू यांनी मोदींचे कौतुक करणाऱ्या पोस्टही केल्या असून, त्यांच्या भेटीला विरोध करणाऱ्यांवर टीकाही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *