भारताला अंशतः स्वतंत्र देश म्हणणाऱ्या अमेरिकेवर ले. जनरल डी. पी. पांडे यांची टीका; युरोपवर निर्लज्जपणाचा आरोप

Share

नवी दिल्ली: अमेरिकेने स्वतंत्र देशांची यादी दर्शवणारा ‘फ्रीडम हाऊस’चा नकाशा पोस्ट केला आहे. या नकाशाद्वारे ऑस्ट्रेलियातील अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे, की ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध दृढ करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील नागरिकांचे ‘स्वातंत्र्य’ आहे. तसेच, या नकाशाद्वारे चीनवरही टीका करण्यात आली आहे. या नकाशावर जगातील देशांमधील स्वातंत्र्याची स्थिती दर्शवण्यात आली आहे. पहिल्या स्थानावर स्वतंत्र देश, दुसऱ्या स्थानावर अंशतः स्वातंत्र्य असलेले देश, तर तिसऱ्या स्थानावर स्वातंत्र्याची स्थिती अत्यंत वाईट असलेले देश आहेत. ऑस्ट्रेलियातील अमेरिकी दूतावासाच्या एका ‘एक्स’वरील एका पोस्टवरून भारतात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

फ्रीडम हाऊसच्या २०२५ च्या ‘फ्रीडम इन द वर्ल्ड’ अहवालानुसार, भारताचा समावेश अंशतः स्वतंत्र देश म्हणून करण्यात आला आहे. पाकिस्तानचाही समावेश अंशतः स्वतंत्र देश म्हणून करण्यात आला आहे.

त्याच अहवालाचा हवाला देत अमेरिकेने ऑस्ट्रेलियासोबतच्या आपल्या संबंधांविषयी म्हटले, हा नकाशा आमच्या संबंधांचे उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्य हा आमच्या मजबूत संबंधांचा पाया आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया स्वतंत्र राष्ट्र म्हणून एकत्र उभे आहेत, जिथे लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याचे, मतदान करण्याचे आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. चीनमध्ये हे स्वातंत्र्य दिले जात नाही.

या नकाशात भारतासोबत पाकिस्तानलाही अंशतः स्वतंत्र देश म्हटले गेले, तेव्हा भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी उपरोधिकपणे पण परखड उत्तरात, खरेच? पाकिस्तान अंशतः स्वतंत्र आहे? तुम्ही ब्राझीलच्या विरोधी पक्षनेत्याला तिथून हाकलून दिले का, तो आता स्वतंत्र आहे का? आज युरोपच्या बहुतेक भागांमध्ये, बलात्कार किंवा ज्याला सभ्य भाषेत ‘ग्रूमिंग’ म्हटले जाते, त्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागू शकते, हे ‘स्वातंत्र्य’ आहे का? आपण यावर विचार करायला हवा.

जनरल डी. पी. पांडे यांनी उपहासाने लिहिले, की डोनाल्ड ट्रम्प आणि राजदूतांना विचारा, ज्यांना निळा रंग आवडणार नाही, जो संपूर्ण अमेरिका आणि जगभरात डेमोक्रॅट्सचा रंग मानला जातो.

फ्रीडम हाऊसच्या ‘२०२५ फ्रीडम इन द वर्ल्ड’ अहवालानुसार, २०२४ मध्ये ५४ देशांमध्ये राजकीय आणि नागरी स्वातंत्र्याचा दर्जा खालावला, तर केवळ ३५ देशांमध्ये सुधारणा दिसून आली. २०२४ च्या तुलनेत, गिनी-बिसाऊ, टांझानिया, बुर्किना फासो, मादागास्कर आणि एल साल्वाडोर यांच्या गुणांमध्ये सर्वात मोठी घट झाली, तर सीरिया, श्रीलंका, बोलिव्हिया आणि गॅबॉनमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आली.

‘फ्रीडम इन द वर्ल्ड इंडेक्स’ हा ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकन स्वयंसेवी संस्थेद्वारे संकलित केला जाणारा एक वार्षिक निर्देशांक आहे. तो जगभरातील देशांमधील आणि प्रदेशांमधील नागरी व राजकीय स्वातंत्र्यांचे मूल्यांकन करतो. त्याचे निकष संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या १९४८ च्या मानवाधिकार घोषणेवर आधारित आहेत. या अहवालाचा उद्देश सरकारांऐवजी व्यक्तींच्या राजकीय हक्कांचे आणि नागरी स्वातंत्र्यांचे मूल्यांकन करणे हा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!