इस्लामाबाद: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर मर्लिन मन्रोच्या फोटोवर केलेल्या एका टिप्पणीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक वापरकर्त्यांनी एका तरुण महिलेच्या फोटोवर केलेली त्यांची टिप्पणी निर्लज्जपणाची असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी संरक्षणमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीसाठी हे अव्यावसायिक असल्याचे म्हटले आहे. अनेक वापरकर्त्यांनी त्यांचे खाते कोण हाताळत आहे, अशा क्षुल्लक टिप्पण्या कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ख्वाजा असिफ यांनी ओलिव्हिया एमी नावाच्या महिलेच्या सोशल मीडियावरील खात्यावर टिप्पणी केली. एमी ही न्यूयॉर्कस्थित एक कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर असून, ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. मंगळवारी, एमीने मर्लिन मन्रोचा एक ऑप्टिकल इल्युजन फोटो शेअर करत लिहिले, हे फक्त तीक्ष्ण नजर असलेल्यांसाठी आहे. फोटोमध्ये अशी एक गोष्ट तुम्हाला दिसते का जी १९५६ सालची नाही? नीट पाहा, ती सर्वांच्या डोळ्यासमोरच आहे.
असिफ यांनी एमीचा फोटो कोट-ट्विट करत ‘बघा’ असे लिहिले. याने लगेचच पाकिस्तानी लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी ख्वाजा असिफ यांना लक्ष्य केले. विशेषतः कट्टरपंथीयांच्या कमेंट्समध्ये, फोटोमधील मन्रोच्या तोकड्या कपड्यांवर बोट ठेवण्यात आले. या युझर्सनी म्हटले की, पाकिस्तानच्या मंत्र्याकडून अशी अपेक्षा नाही आणि ही वृत्ती अयोग्य आहे.
ख्वाजा आसिफ यांच्या विरोधात सर्वात कठोरपणे ट्विट करणाऱ्यांमध्ये अफगाणिस्तानचे बुरहानुद्दीन होते. बुरहानने ‘एक्स’वर ख्वाजा असिफ यांची कमेंट शेअर करत लिहिले, ‘या निर्लज्ज माणसाकडे बघा! तो पाकिस्तानचा संरक्षणमंत्री आहे. ख्वाजा, इतक्या लवकर पिणे थांबवा. तुम्ही संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची नाचक्की करत आहात. तुम्ही ‘एक्स’वर नग्न मुलींचे फोटो पोस्ट करत आहात.’
ख्वाजा असिफ हे एक ज्येष्ठ पाकिस्तानी राजकारणी आहेत, पण ते अनेकदा चुकीच्या कारणांमुळेच चर्चेत राहतात. अलीकडेच, एका अफगाण महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘जर ती परत गेली तर तालिबान तिला ठार मारतील’ असे म्हटल्यामुळे त्यांना ऑनलाइन टीकेला सामोरे जावे लागले. हे सांगताना त्यांनी असा हावभाव केला, जणू काही ती स्वतःचा गळा चिरून घेणार आहे.
ख्वाजा असिफ भारताविषयीही वारंवार वक्तव्ये करतात. मे २०२५ च्या लष्करी संघर्षापासून, त्यांनी भारताविषयी वारंवार वक्तव्ये केली आहेत. सिंधू कराराच्या मुद्द्यावरून भारताला धमकावण्याचा प्रयत्न करताना ते अनेकदा दिसले आहेत. त्यांनी पाकिस्तानी राजकारणावरही अशी वक्तव्ये केली आहेत, जी त्यांच्या स्वतःच्या सरकारसाठी अडचणीचे कारण बनली आहेत.