इंडी अलायन्सची भेट घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा नकार; न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला

Share

नवी दिल्ली: विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडी अलायन्सतर्फे आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून, सरन्यायाधीशांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेण्याचे नाकारले आहे. अलायन्सच्या नेत्यांनी आपल्याला निवेदन सादर करण्याऐवजी त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला दिला आहे.

निवडणुकीत फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करणारे निवेदन सादर करण्यासाठी, आज विरोधी पक्षांच्या आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. न्यायालयातील अधिकृत सूत्रांनुसार,सरन्यायाधीशांनी सांगितले, की आघाडीने उपस्थित केलेले मुद्दे आधीच न्यायालयीन विचाराधीन आहेत.

सरन्यायाधीशांनी म्हटले आहे, की कोणत्याही राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाला प्रशासकीय स्तरावर अशा प्रकारे भेटण्याचा न्यायालयाला अधिकार नाही आणि याचिका ऐकून निकाल देणे हा त्यांचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च न्यायिक संस्था असल्याने तिचे दरवाजे सर्वांसाठी २४ तास खुले आहेत आणि ते प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षांना कळवण्यात आले आहे, की कोणत्याही विरोधी पक्षाच्या सदस्याने दाखल केलेली कोणतीही याचिका, पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आधीच सूचीबद्ध असलेल्या, एसआयआर प्रक्रियेसंबंधित तत्सम प्रकरणांसोबत ऐकली जाऊ शकते.

सूत्रांनुसार, विरोधी पक्षनेत्यांच्या अधिकृत ईमेलला दिलेल्या उत्तरात सरन्यायाधीशांनी असे मत व्यक्त केले, की अशी बैठक अनुचित ठरेल, कारण उपस्थित करू इच्छिणारे मुद्दे आधीच सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!