नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यांवर, देशभरातील आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची घोषणा, कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेत्यांनी केली आहे. रविवारी सीजेपीच्या नेत्यांची प्रतिबंधात्मक कोठडीतून सुटका झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील बंदोबस्त कायम असून, आणखी शंभर जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची २४ तासांनंतर सुटका करण्यात आली. वर्षभर शांततेचा भंग करणार नाही, या अटीवर न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. मात्र, आपल्याला सुनावण्यात आलेली कोठडी बेकायदा होती आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असे या नेत्यांनी जाहीर केले.
दरम्यान, इंडी अलायन्सतर्फे आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की आपण स्वतः आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्यासाठी सरन्यायाधीशांकडे दुपारी चार ते पाच या वेळेत भेटीची मागणी केली आहे.
अभिजीत दीपके कोठडीत असतानाच त्यांच्या आजीचे निधन झाले. या वृत्ताची माहिती देताना अधिकाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोप आशुतोष रांका यांनी केला. सुटकेनंतर दीपके आपल्या मूळ गावी रवाना झाले; मात्र आंदोलन चालूच राहणार असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतता आणि चांगले वर्तन राखण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीकरिता ५० हजार रुपयांचा जामीन व हमीपत्र सादर करण्यात आल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने तिघांची सुटका केली आहे.
‘आम्ही कुख्यात गुन्हेगार नाही. आम्ही नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी जात नव्हतो. आंदोलनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी निदर्शने केल्याने शांतता भंग होत नाही,’ असे रांका यांनी सांगितले. ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला, तर ते कोणत्याही पक्षासाठी चांगले नाही. जबाबदारी निश्चित होईपर्यंत संपूर्ण देशात आंदोलने होतील, असेही त्यांनी सांगितले.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) आणि क्रांतिकारी युवा संघटना (केवायएस) यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे सदस्य, तसेच सीजेपीचे समर्थक राजधानीतील वेगवेगळ्या भागांतून जंतरमंतरकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करणार नाही, असे कोणतेही हमीपत्र आपल्याला किंवा सीजेपीच्या अन्य नेत्यांनी दिलेले नाही, असे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी नागपूर येथे आपल्या मूळ गावी आल्यानंतर स्पष्ट केले. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही घाबरत नाही, असे त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी हिंगोलीला रवाना झाले. ‘मला शंभर वेळा तुरुंगात टाका. तुमच्या हुकूमशाहीला आम्ही घाबरत नाही. ही हुकूमशाही आम्ही संपवू,’ असा इशाराही दीपके यांनी दिला.