मुंबईः राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली असून, राज्य सरकारने आतापर्यंत २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू आहे. दरम्यान, २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आले आहे, मात्र दुष्काळाच्या निकषात न बसणाऱ्या आणखी १९ तालुक्यांचा फेरविचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दत्तात्रय भरणे म्हणाले, की राज्यात २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. प्रत्येक पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात दिले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४९ लाख हेक्टर्स शेतजमिनींपैकी ६५ लाख २६ हजार हेक्टर जमिनींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बाकी काम देखील सुरू आहे. १० तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण करण्यात येतील. महसूल कृषी अधिकारी बांधावर जाऊन पंचनामे करत आहे. विभागनिहाय पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर विभागात ६८ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुणे विभागात ३० टक्के, तर नाशिक विभागात २२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोकण विभागात पंचनाम्यांचे प्रमाण सर्वात कमी असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळ पाहणीसाठी केंद्र सरकारने एक पथक तयार केले आहे. मुक्तानंद अगरवाल हे या पथकाचे प्रमुख असतील. पुढील ४ ते ५ दिवसांत ते महाराष्ट्रात येतील. जलसंधारण कृषी विभागाच्या माध्यमातून हे काम होईल. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांसोबत आहे, अशी खात्री देऊन ते म्हणाले, की केंद्र सरकारकडे १७ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.
राज्यभरात एकूण ४३ टक्के पंचनामे झाले आहेत. वाढीव १९ तालुक्यांबरोबरच इतर तालुक्यांमधील स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. राज्यात पिकांची उगवण झालेलीच नाही, त्यामुळे मदत मिळणे गरजेचे आहेच. महिला शेतकरी धोरण हे विधेयक आपल्या राज्याने आणले आहे. १७ सप्टेंबरपासून त्याची सुरुवात केली आहे. राज्यातील ३३ लाख महिलांनी अर्ज केले आहे. सर्वात जास्त २ लाख अर्ज यवतमाळ जिल्ह्यातून आले आहेत, अशी माहिती देखील भरणे यांनी दिली.
One thought on “दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांच्या यादीत आणखी १९ तालुक्यांचा समावेश – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती”