नवी दिल्लीः भारतात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर अनेक जागतिक नेते आजारी पडल्याचे दावे करणारे वृत्त, परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी फेटाळून लावले आहेत. हे वृत्त ‘बनावट’ असल्याचे म्हटले आहे.
‘एक्स’ या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, मंत्रालयाच्या तथ्य-तपासणी युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘दुर्भावनापूर्ण’ पोस्ट म्हणून संबोधलेल्या गोष्टींविरुद्ध सावध केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अशा द्वेषपूर्ण पोस्टपासून सावध राहावे, असे त्यात म्हटले होते.
दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भारतातील ब्रिक्स शिखर परिषदेतून परतल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे, त्यांच्या कार्यालयाने सांगितल्यानंतर मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी ७३ वर्षीय अध्यक्षांना विश्रांती घेऊन बरे होण्याचा सल्ला दिला असल्याचेही सांगण्यात आले. रामफोसा सोमवारी शिखर परिषदेतून परतले आणि तेव्हापासून वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत, असे दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती पॉल माशातिले हेदेखील एका छोट्या वैद्यकीय उपचारांतून बरे होत असल्याने, दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सर्वोच्च नेते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत.
अनेक असत्यापित वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वैद्यकीय कारणांमुळे ब्रिक्स शिखर परिषदेतून लवकर निघून, एका विशेष विमानाने परतले.