नवी दिल्लीः भारतीय लष्कराने अमेरिकेसोबत जॅव्हेलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा करार केला आहे, अशी माहिती भारतातील अमेरिकी दूतावासाने आज (शुक्रवारी) येथे दिली; मात्र या कराराचे मूल्य उघड करण्यात आले नाही.
लॉकहीड मार्टिन आणि आरटीएक्स यांनी संयुक्तपणे उत्पादित केलेली ही मध्यम पल्ल्याची मार्गदर्शित (गाईडेड) क्षेपणास्त्र प्रणाली, चिलखती वाहनांसह विविध प्रकारच्या लक्ष्यांविरुद्ध वापरण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असे दूतावासाने सांगितले.
या संदर्भात बोलताना अमेरिकेचे भारतातून दूत सर्जिओ गोर म्हणाले, की ही क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकेच्या लष्कर आणि मरीन कोअर, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या सेवेत आधीपासूनच आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्र काम करण्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. दोन्ही देशांचा संरक्षण औद्योगिक पाया मजबूत करणाऱ्या भविष्यातील सहकार्यासाठी आम्हाला प्रचंड क्षमता दिसते.
या करारावर प्रतिक्रिया देण्यासाठी नवी दिल्लीकडून तत्काळ संपर्क होऊ शकला नाही. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, भारत हा लष्करी खर्चाच्या बाबतीत जगातील पाचवा सर्वांत मोठा देश असून, युक्रेननंतर शस्त्रास्त्रांचा दुसरा सर्वांत मोठा आयातदार देश आहे.
भारत आणि अमेरिकेने गेल्या ऑक्टोबरमध्ये १० वर्षांच्या संरक्षण आराखडा करारावर स्वाक्षरी केली होती. अलिकडच्या काही महिन्यांत वॉशिंग्टनने भारतीय मालावर उच्च शुल्क लादल्याने, रशियन तेल खरेदी केल्याबद्दल नवी दिल्लीला शिक्षा केल्याने आणि भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी जवळीक साधल्याने दोन्ही देशांमधील संबंध खालावले असले, तरी संरक्षण संबंधांवर कोणताही परिणाम झालेला नाही.