नागपूर: भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांना भुंकायला ठेवले आहे. त्यांचे ते काम ते उत्तमरित्या करत आहेत. तेच त्यांचे काम आहे, असी जहरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित ठाकरे यांनी येथे केली.
अमित ठाकरे हे नागपूरच्या दौऱ्यावर असून, त्यांनी पाचपावली परिसरातील सिंधू महाविद्यालयाला भेट दिली. मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्यता मोहीम कक्षाला भेट देऊन त्यांनी सदस्यता मोहीम प्रक्रियेची माहिती घेतली. यापूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
अमित साटम यांनी मराठी भाषेवरुन राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, की राज ठाकरे यांनी आपल्या नातवाला म्हणजेच आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या बालमोहन विद्यालयात प्रवेश घ्यावा आणि मग इतरांवर टीका करावी, असे आव्हान अमित साटम यांनी दिलं होतं.
अमित ठाकरे म्हणाले, की अमित साटम यांना भुंकायलाच ठेवले आहे. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचे काम आहे. त्यांना स्वत:च्या भाषेचे, राज्याचे काहीच पडलेले नाही. आपल्या मुलाने कोणत्या शाळेत जावे, याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही.
अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये सभासद नोंदणी झाली. आपण सध्या राज्यभर सभासद नोंदणी करण्यासाठी फिरत आहोत. मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक आदी ठिकाणी नोंदणी झाली आहे. महाविद्यालयांच्या पातळीवर काय अडचणी, समस्या आहेत ते जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आज संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. कधी काही लागले, तर आम्ही तुमच्या मागे उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी अमित ठाकरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले. या सरकारला काहीही पडले नाही, गाणी वैगरे दुय्यम झाले आहे, आदिवासी विद्यार्थी १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, जीआर रद्द झाला आहे. जाहीर केलेले एक कोटी रुपये अजून आलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.